चोपडा, 19 डिसेंबर : भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या देशातील सर्वांत प्रतिष्ठित व मानाची नवोपक्रम स्पर्धा स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) २०२५ च्या ग्रँड फायनलमध्ये चोपड्याचा सुपुत्र मानस महेंद्र भोळे याने राष्ट्रीय पातळीवर दैदीप्यमान यश संपादन करत विजेतेपद पटकावले आहे. या यशामुळे चोपड्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, संपूर्ण तालुक्यातून मानसवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संपूर्ण भारतातून नवोपक्रमशील व प्रतिभावान युवकांनी सहभाग घेतलेल्या या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेची उपांत्य फेरी मुंबई येथे, तर अंतिम फेरी कानपूर (उत्तर प्रदेश) येथे पार पडली. या दोन्ही फेऱ्यांमध्ये मानस भोळे याने आपल्या सहकाऱ्यांसह उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, नाविन्यपूर्ण कल्पनाशक्ती आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली. मानस भोळे याच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरीत अव्वल कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला.
विशेष म्हणजे, संपूर्ण भारतातून तब्बल 380 संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत मानसच्या संघाने देशात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल विजेत्या संघाला ₹1,50,000/- रुपयांचे रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
स्मार्ट इंडिया हॅकाथॉन ही स्पर्धा देशातील तरुणांमध्ये नवोपक्रम, संशोधन आणि विविध समस्यांवर तांत्रिक उपाय शोधण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित केली जाते. ३६ तासांच्या कठोर परिश्रमातून, योग्य जेवण व झोपेची तमा न बाळगता, संघाने उत्कृष्ट उपाय सादर करत हा विजय मिळवला.
या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य अविनाश सिंग चौहान, PSIT गट संचालक प्रा. डॉ. मनमोहन शुक्ला, तसेच AICTE उपसंचालक डॉ. प्रशांत कुमार खरात, विनायक पचलग आणि संचालक प्रा. डॉ. राघवेंद्र सिंह यांच्या हस्ते विजेत्या संघांचा सन्मान करण्यात आला. विविध मंत्रालयांतील ज्युरी सदस्यांनी यंदा विद्यार्थ्यांनी समस्यांकडे नवीन दृष्टिकोनातून पाहत नाविन्यपूर्ण उपाय सादर केल्याचे नमूद केले. डॉ. मनमोहन शुक्ला यांनी स्पष्ट केले की, ज्युरीने एकूण चार टप्प्यांतील मूल्यांकनावर आधारित गुणांकन केले.
कार्यक्रमादरम्यान संस्थेत नावीन्य, तंत्रज्ञान आणि तरुणाईच्या ऊर्जेचे अनोखे वातावरण अनुभवायला मिळाले. यावेळी डॉ. विशाल नागर, डॉ. रघुराज सिंह सूर्यवंशी, डॉ. आरती सक्सेना आणि डॉ. सुमित चंद्रा उपस्थित होते.
मानस महेंद्र भोळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील ‘Team Visioncraft’ या संघाने Real-Time AI/ML-Based Phishing Detection and Prevention System या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये उत्कृष्ट उपाय सादर करत विजेतेपद पटकावले.
मानसच्या या घवघवीत यशाबद्दल पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले तसेच विद्यमान अध्यक्ष पंकज बोरोले यांनी विशेष अभिनंदन केले आहे. चोपड्याच्या भूमीने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केल्याचे हे यश तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.






