मुंबई, 23 डिसेंबर : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या गोष्टींची सर्वात जास्त चर्चा होती, अखेर तो क्षण आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र कधी येणार, शिवसेना आणि मनसेमध्ये युती होणार का, ती कधी होणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज महाराष्ट्राला मिळाली आहेत. मुंबईतील वरळी येथील हॉटेल ब्लू सीमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे.
ठाकरे बंधूच्या युतीची घोषणा –
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा अखेर आज 24 डिसेंबर रोजी दुपारी झाली आहे. राज ठाकरे युतीची घोषणा करताना म्हणाले की, जे काही बाकी बोलायचं ते जाहीर सभेत बोलू. माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामहून आठवण करून देतो की त्यात मी म्हटलं होतं, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि त्या वाक्यापासून एकत्र येण्याची सुरुवात झाली.
View this post on Instagram
दरम्यान, कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा तुम्हाला सांगणार नाही. महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवण्याच्या टोळ्या फिरत असून आता त्यात दोन जास्त टोळ्या अॅड झाल्या आणि त्या राजकीय पक्षातील टोळ्या पळवतात. जे निवडणूक लढवत आहेत. त्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाणार असून अर्ज कधी भरायचे ते देखील कळवली जाईल. दरम्यान, महाराष्ट्राला प्रतिक्षा असलेली घोषणा म्हणजे..शिवसेना आणि मनसेची युती झाली हे जाहीर घोषणा करत आहोत, असे राज ठाकरे म्हणाले.
तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईकडे-महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा किंवा कपटी कारस्थानाने मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. दरम्यान, भाजपने बटेंगे तो कटेंगे हा जो अपप्रचार केला होता, तसेच मी मराठी माणसाला सांगतो आता जर चुकाल तर संपाल. तसेच आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, असेही ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन –
युतीच्या घोषणेपुर्वी आज सकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र मिळून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. यावेळी रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी एकत्र मिळून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाकरे कुटुंबीयांना एकत्र पाहून यावेळी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे डोळे पाणावले.






