ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 13 जानेवारी : पाचोरा नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व नामनिर्देशीत सदस्य निवडीकरीता 12 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले. या सर्वसाधारणसभेत किशोर बारवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यासोबत स्वीकृत नगरसेवकपदी ॲड.योगेश जगन्नाथ पाटील व शरद बाळकृष्ण वाणी (पाटे) तसेच अविनाश देविदास सुतार यांची निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सुनिताताई पाटील, मुख्याधिकारी मंगेश देवरे, यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक तसेच परिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
उपनगराध्यपदी किशोर बारवकर यांची बिनविरोध निवड –
पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल करण्यासाठी 12 जानेवारी रोजी 11 वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. विहीत मुदतीत मुख्याधिकारी देवरे यांच्याकडे किशोर गुणवंत बारवकर यांचेच नामनिर्देशनपत्रे दाखल झाल्याने प्राप्त नामनिर्देशनपत्रे वैध असल्याने पाचोरा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
तिघांची स्वीकृत सदस्यपदी निवड –
यासोबतच पाचोरा नगरपरिषदेत एकूण 3 स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्यावतीने ॲड. योगेश जगन्नाथ पाटील व शरद बाळकृष्ण वाणी (पाटे) यांचे नावाची नामनिर्देशीत सदस्य म्हणून घेण्यासाठी शिवसेना गटनेता श्री.सुमित किशोर पाटील यांनी शिफारस करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपचे गटनेता सुरज संजय वाघ यांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी अविनाश देविदास सुतार यांच्या नावाची शिफारस केली. दरम्यान, तीन्ही नावांची छानणी करून ते योग्य आढळून आल्याने त्यांची नामनिर्देशीत सदस्य (स्वीकृत नगरसेवक) म्हणून नियुक्ती झाल्याचे पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील यांनी जाहिर केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजय गोहील, गटनेते सुमित पाटील, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर अधिक्षक डी.एस.मराठे, तसेच सर्व नवनियुक्ती सदस्य, अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा : महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी






