चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 17 जानेवारी : खान्देशातील जळगाव आणि धुळे या दोन्ही महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून आघाडी मिळवलीय. यासोबतच धुळे महानगरपालिकेतही भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. दोन्ही ठिकाणी मिळालेल्या यशामुळे खान्देशात भाजपची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
जळगावात महायुतीचे ऐतिहासिक विजय; भाजप ‘टॉप’ला –
जळगाव महानगरपालिकेत भाजपने, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन्ही पक्षांनी महायुती म्हणून निवडणूक लढवली. यामध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 46 जांगा जिंकल्या आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेने 22 आणि अजित दादांची राष्ट्रवादीने 6 पैकी 1 जागेवर विजय मिळवलाय. यामध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून जळगावात भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केलंय. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 उमेदवार निवडून आले आहेत. तर एका अपक्ष उमेदवाराने देखील विजय मिळवलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि एमआयएम पक्षाचा एकही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही.

धुळे महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता –
धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवत एकहाती सत्ता काबीज केलीय. धुळ्यात 74 जागांपैकी तब्बल 50 जागा भाजपने जिंकल्या असून महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. यामध्ये भाजपच्या चार जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. तसेच अजित दादांच्या राष्ट्रवादीने 8 तर शिंदेंच्या शिवसेनेने 5 जागा जिंकल्या. तर दुसरीकडे एमआयएमने 20 जागा लढवत 10 जागांवर विजय मिळवल्याने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. तर एका जागेवार अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे.







