ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 17 जानेवारी : पाचोरा तालुक्याला संजिवनी ठरलेल्या बहुळा धरणात (कृष्णा सागर जलाशय) मुबलक प्रमाणात जलसाठा असून आज 17 जानेवारी रोजी सकाळी पहिले आवर्तन सोडण्यात आले. पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते पुजन करुन पहिले आवर्तन सोडण्यात आले. शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी करून जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा पाचोरा नगरपरिषदेचे नगरसेवक गणेश पाटील, माजी जि.प. सदस्य पद्मसिंह पाटील, विनोद तावडे, डॉ. अस्मिता पाटील, किरण पाटील, पाचोरा जलसंपदा उपविभागीय अभियंता पी.टी. पाटील, यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
500 हेक्टरपर्यंतचे क्षेत्र ओलिताखाली येणार –
उपविभागीय अभियंता पी.टी. पाटील याबाबत सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना म्हणाले की, बहुळा मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामीतील पहिले आवर्तन आज सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून अद्याप 200 हेक्टर्सपर्यंत मागणी करण्यात आली आहे. रब्बी आवर्तन सोडण्यात आल्यानंतर बहुळा धरण अंतर्गातील 500 हेक्टरपर्यंतचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बहुळा मध्यम प्रकल्पाच्या 13.34 किमी लांबीच्या असलेल्या शेवटच्या क्षेत्रापर्यंत हे पाणी पोहचते.
View this post on Instagram
पहिले आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत राहणार –
शाखा कालव्याच्या लांबीत पाणी सोडण्याची मागणी असल्याने शाखा कालव्याच्या 10 किमीपर्यंतच्या लांबीत पाणी सोडण्याचा विभागाचा मानस असून शेतकऱ्यांच्या क्षेत्रीय मागणीनुसार याचा निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, रब्बी हंगामातील पहिले आवर्तन हे 28 फेब्रुवारी पर्यंत राहणार असून तीन आवर्तन देण्याचे विभागाचे नियोजन आहे. मात्र, उन्हाळ्यातील परिस्थितीत पिकांचा विचार करून तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुढील आवर्तन कमी-अधिक करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
हेही वाचा : खान्देशातील जळगाव-धुळे महानगरपालिकेत ‘भाजपचं टॉप’; ‘असा’ आहे निवडणुकीचा संपुर्ण निकाल






