नाशिक, 21 फेब्रुवारी: मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केलेला मानहानीचा दावा अखेर मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मालेगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. विशेष म्हणजे दादा भुसे आणि संजय राऊत दोघेही एकत्र न्यायालयात दाखल झाले आणि एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले. त्यानंतर हे प्रकरण निकाली निघाले.
सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सांगितले की, न्यायालयात मंत्री भुसे त्यांच्या शेजारीच बसले होते आणि हा विषय आता संपुष्टात आला आहे. पूर्वीपासून असलेले संबंध आणि संवाद यामुळे गैरसमज दूर झाले. चुकीच्या माहितीतून हा वाद निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणामागे चुकीची माहिती कारणीभूत ठरल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे संबंधितांवर टीका केली. “ज्यांच्यामुळे हा विषय निर्माण झाला ते आता आमच्यात नाहीत. त्यामुळे हा विषय इथेच थांबवूया,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, दादा भुसे यांनी सांगितले की गिरणा साखर कारखान्याच्या संदर्भात 178 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. ‘सामना’मधील बातमी आणि त्यानंतर केलेल्या वक्तव्यांमुळे मालेगावातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. प्रत्यक्षात केवळ 1 कोटी 70 लाख रुपये जमा करण्यात आले होते आणि ते नियमानुसार जमा केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आरोपांमुळे शेतकरी व जनतेची प्रतिमा मलिन झाली, म्हणूनच न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता.
दादा भुसे यांनी पुढे सांगितले की, संजय राऊत यांनी शेतकरी व नागरिकांची माफी मागितल्याने आणि गैरसमज दूर झाल्याने त्यांनी हा दावा मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसेच राऊत यांच्या प्रकृतीचा विचार करूनही सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले. “आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केले आहे. मला काय करता येते आणि काय नाही, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. बातमी देण्यापूर्वी खातरजमा व्हायला हवी होती,” असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दादा भुसे यांच्यावर गिरणा अॅग्रो प्रकरणात गंभीर आरोप केले होते. शेतकऱ्यांकडून 178 कोटी 25 लाख रुपये शेअर्सच्या माध्यमातून गोळा केल्याचा आणि कंपनीच्या संकेतस्थळावर केवळ 1 कोटी 67 लाख रुपये दाखविल्याचा आरोप त्यांनी केला होता. या वक्तव्यानंतर दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. दरम्यान, संजय राऊत यांनी माफी मागितल्यानंतर आणि परस्पर समन्वयाने हा वाद मिटविण्यात आल्याने हे प्रकरण मिटलंय.






