जळगाव, 29 एप्रिल: जळगाव जिल्ह्यातील फैजपूर आणि वरणगाव परिसरात गॅस सिलेंडर चोरीच्या दोन मोठ्या घटनांचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उलगडा करत अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
नेमकं प्रकरण काय? –
फैजपूर येथील श्रीधर गॅस एजन्सीचे संचालक ललित रघुनाथ राणे यांनी 25 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून 14.2 किलो वजनाचे 100 भरलेले गॅस सिलेंडर चोरून नेले होते. या प्रकरणात सुमारे 3,11,800 रुपयांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तसेच, वरणगाव येथे 26 फेब्रुवारी 2026 रोजी घडलेल्या तत्सम घटनेत 57 गॅस सिलेंडर चोरीस गेले होते. या चोरीत सुमारे 72,846 रुपयांचे नुकसान झाले होते. दोन्ही घटनांच्या तपासासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेची दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.
गोपनीय माहिती आणि घटनास्थळी केलेल्या बारकाईच्या तपासाच्या आधारे संशयित वाहनांचा मागोवा घेण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी शेख बिलाल शेख नबी (वय 32), वसीम खान शाबीर खान (वय 39) आणि चेतन सुरेश काळे (वय 38) या आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या इतर साथीदारांसह दोन्ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपींना फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक, मैनुद्दीन सैय्यद व विनोद गाभणे हे करीत आहेत.
यांनी केली कारवाई –
ही कारवाई एसपी श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ भाग तथा प्रभार मुक्ताईनगरचे केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रितम पाटील, तसेच प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील, यशवंत टहाकळे, पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांच्यासह पोलीस अंमलदार बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयूर निकम यांनी केली. तसेच या कारवाईसाठी तांत्रिक सहाय्य पोलीस अंमलदार गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी केले.
हेही वाचा: धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?






