इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 1 सप्टेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने राज्यासह जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भातील निवदेन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पाचोऱ्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार –
आमदार किशोर पाटील म्हणाले की, काही दिवसांपासून पाऊस नसल्याने पाचोरा-भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातला शेतकरी अडचणीत आला आहे. कडाक्याचे उन्हाने पीके करपण्याच्या अवस्थेत असल्याने खरीप हंगामाचे पीक वाया जाते की काय, अशा संकटात शेतकरी सापडला आहे. पाचोरा-भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्हा दुष्काळी जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उर्जामंत्र्यांंना भेटणार –
आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की, जिल्हाभरात इमर्जंन्सी लोडसेटिंग सुरू झाली आहे. एकीकडे पावसाचा अभाव व दुसरीकडे शेतकऱ्यांना खंडित वीजपुरवठा या समस्यांमुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. यासंदर्भात जिल्ह्यातील महावितरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी आमच्या हातात काहीच नसल्याचे सांगितले. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याबाबत निवेदन देणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आठवडे बाजारावरील बंदी उठवा –
जळगाव जिल्ह्यात लम्पीच्या प्रादुर्भावामुळे पाचोरा तालुक्यातील जनावरांचा आठवडे बाजार बंद करण्यात आल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात आमदार किशोर पाटील म्हणाले की, जनावरांचा आठवडे बाजार बंद असल्याने अनेकांचे नुकसान होत आहे. यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आठवडे बाजारात गोवंशवर बंदी करावी; मात्र म्हशी, शेळ्या-मेंढ्या यांच्या खरेदी-विक्रीसाठी आठवडे बाजारातील बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी करणार आहे.