चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 9 सप्टेंबर: जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सरपंचांकडे सोपविण्यात आलेल्या प्रभारी प्रशासकपदाची मुदत 31 ऑगस्ट रोजी संपली आहे. त्यामुळे आता संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा सरपंचांची नियुक्ती करायची की शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करायची, याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. शासनाकडून यासंदर्भात मार्गदर्शन मागविण्यात आले असून, येत्या एक-दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्याकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे निवडणुका न झालेल्या किंवा प्रशासकीय व्यवस्था आवश्यक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांना प्रभारी प्रशासक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. या नियुक्तीचा सहा महिन्यांचा कालावधी 31 ऑगस्ट रोजी पूर्ण झाला. त्यामुळे मुदत संपल्यानंतर ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत पुढील व्यवस्था काय असणार, याकडे ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, प्रशासकांच्या नियुक्तीबाबत शासनाकडून अद्याप स्पष्ट निर्देश प्राप्त झालेले नसल्याने जिल्हा पातळीवरही निर्णयाची प्रतीक्षा आहे. यामुळे ग्रामपंचायतींमध्ये पुढील काही दिवसांत प्रशासकीय स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे.
येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय –
याबाबत जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सरपंचांची प्रभारी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीची मुदत आता संपली आहे. या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर मार्गदर्शन मागविण्यात आले असून, येत्या एक-दोन दिवसांत मार्गदर्शन प्राप्त होईल. त्यानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे आता शासनाच्या मार्गदर्शनानंतर ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी सरपंचांकडेच पुन्हा जबाबदारी सोपविली जाणार की प्रशासक म्हणून शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश






