ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 27 सप्टेंबर: राज्यातील पाचोरा-भडगावसह 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषिमंत्री दत्ता भरणे आणि महायुती सरकारचे आभार मानत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी मदतनिधी जमा होईल, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला. पाचोरा शहरातील शिवसेना कार्यालयात आज 27 सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
ग्रामीण भागात सध्या अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. काही शेतकरी उरलेले पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत; मात्र महावितरणच्या कारभारामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समाविष्ट झाल्याने आता राज्य सरकारकडून मतदारसंघाला भरीव मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
‘राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल’ –
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात होती. आता दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मदत कधी मिळणार, मदत मिळाल्यानंतर ती तुटपुंजी असल्याचा आरोप केला जाईल. शासनावर टीका करण्याचे कामच विरोधकांकडे उरले आहे, अशी टीका आमदार पाटील यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल, याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मतदारसंघासह जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी सरकारकडून गोड केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
View this post on Instagram
दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. शासनाचा जीआर प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल. त्यानंतर सरकारच्या आश्वासनानुसार दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये मदतनिधी जमा होईल, अशी खात्री असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मानले राज्य सरकारचे आभार –
पाचोरा-भडगाव मतदारसंघावर मागील काळात अनावधानाने अन्याय झाला होता. हा अन्याय दूर करून मतदारसंघातील शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला प्राधान्य देत शासनाने मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 46 कोटी रुपयांचा मदतनिधी उपलब्ध करून दिला, असे आमदार पाटील यांनी सांगितले. याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले.






