मुंबई, 24 ऑक्टोबर: सैन्यदलात चार वर्षे सेवा बजावलेल्या माजी अग्निवीरांना राज्य शासनाच्या पोलीस दलासह विविध गणवेशधारी सेवांमध्ये संधी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील २८२ माजी अग्निवीरांना पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली असून, त्यांना नियुक्तीचे आदेशही देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्य शासनाने माजी अग्निवीरांसाठी गट-क संवर्गातील गणवेशधारी सेवांच्या भरतीत १० टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या पात्र माजी अग्निवीरांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. भरती प्रक्रियेत त्यांना लेखी परीक्षेतून पूर्ण सूट देण्यात आली असून, वयोमर्यादेत चार वर्षांची सवलतही देण्यात आली आहे. याशिवाय शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मानक चाचणीतून सूट देण्यासह ज्येष्ठता, पदोन्नती आणि प्रशिक्षणासंदर्भातही सवलतींची तरतूद करण्यात आली आहे.
View this post on Instagram
केंद्र सरकारने २०२२ मध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलासाठी अग्निपथ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत तरुणांची चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यदलात भरती केली जाते. या काळात त्यांना शिस्त, नेतृत्व, तांत्रिक कौशल्य, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा यांचे प्रशिक्षण दिले जाते. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर कामगिरी आणि अन्य निकषांच्या आधारे २५ टक्के अग्निवीरांना नियमित सेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे. उर्वरित अग्निवीरांना सेवामुक्त केले जाते.
सेवामुक्त झालेल्या अग्निवीरांना राज्य शासनाच्या गृह, राज्य उत्पादन शुल्क, वन आणि नगरविकास विभागांतर्गत विविध गणवेशधारी गट-क पदांवर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नियमांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सैन्यदलातील सेवा पूर्ण केलेल्या तरुणांना राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत रोजगाराची संधी मिळणार आहे.
२८२ जणांना पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती –
राज्यातून २०२२ ते २०२५ या कालावधीत ५ हजार ६४८ तरुण अग्निवीर म्हणून सैन्यदलात दाखल झाले आहेत. त्यापैकी २ हजार ४९६ अग्निवीर यंदा सेवामुक्त होणार असून, पुढील वर्षी ३ हजार ९७७ अग्निवीर सेवामुक्त होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात सेवामुक्त झालेल्या महाराष्ट्रातील २८२ नौदल अग्निवीरांची यादी राज्य शासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार १५० खलाशी डेकसाइड आणि १३२ खलाशी इंजिनसाइड अशा एकूण २८२ जणांना पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.






