जळगाव, 25 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी व ईद- ए- मिलाद उत्सव एकाच दिवशी येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. गणेश विसर्जनाचे पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सज्ज असल्याचे जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सांगितले.
काय म्हणाले एम. राजकुमार –
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यात गणेश उत्सव तसेच ईदच्या पार्श्वभूमीवर बाहेरून 1700 होमगार्ड तसेच इतर पोलीस बंदोबस्त जळगाव जिल्ह्याला मिळाला आहे. तसेच स्थानिक पोलिस बंदोबस्त असा एकूण 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांची राहणार करडी नजर –
एम. राजकुमार पुढे म्हणाले की, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. विसर्जन मिरवणुकीचे मार्ग तसेच मेहरुन तलाव या ठिकाणची पाहणी करण्यात आली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेज ड्रोनच्या माध्यमातून गणेश विसर्जन मिरवणुकीवर पोलीस दलाची करडी नजर राहणार आहे. प्रत्येक सार्वजनिक मंडळांनी विसर्जन मिरवणूक किती वेळ पाळावे याबाबत हे सार्वजनिक गणेश मंडळ प्रतिनिधी यांना सूचना करण्यात आल्याते एम. राजकुमार यांनी सांगितले.