जळगाव, 10 ऑक्टोबर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी मनोरंजक विविध खेळांच्या माध्यमातून भावनिक बुद्धिमत्ता स्मृती आणि संवेदना तपासून प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कला व मानवविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. राम भावसार म्हणाले की, जगभरात मानसिक समस्या वाढत असताना त्याविषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी त्याकरिता हा दिवस साजरा केला जातो. तसेच विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. डॉ. एस.टी. इंगळे म्हणाले की, आयोजित कार्यक्रमात या ठिकाण्या असलेल्या मानसिक चाचण्या उत्तम आहेत. या चाचण्यांचा उपयोग केला तर अविष्कार सारख्या संशोधन स्पर्धेत यांचा मोठा फायदा होईल.
मानसशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉ.वीणा महाजन म्हणाल्या की, जागतिक आरोग्य संघटनेने 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन जाहीर केला आहे आणि सर्व देशांत हा दिवस साजरा केला जातो. काही देशात तर मानसिक आरोग्य सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाद्वारे जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला.
दैनंदिन जीवनात ताण तणाव वाढल्याने मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी आत्महत्येचे प्रमाण वाढले असून ते चिंताजनक आहे. त्यामुळे मनोरंजनातून तणाव मुक्त जीवन जगण्यासाठी, मानसिक आरोग्य जपण्यासाठी विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य चाचण्या केल्या. यावेळी विविध खेळांसह आनंद मेळाव्यात खवय्यांनी आस्वाद घेतला.
विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रोफेसर डॉ. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, माध्यम शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर , कला व मानव्य विद्या प्रशाळेचे संचालक डॉ. राम भावसार यांनी उपक्रमास सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मानस शास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. वीणा महाजन यांनी मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले. यशस्वीतेसाठी विभागातील सर्व विद्यार्थी, सहाय्यक अध्यापक पूजा कोळी, प्रसन्न भालेराव व पंकज शिंपी, दिपाली मराठे, कुंदन ठाकरे, आदींनी परिश्रम घेतले.
जागतिक मानसिक आरोग्य दिन –
जागतिक मानसिक आरोग्य दिन हा दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा 1992 मध्ये वर्ल्ड मेंटल हेल्थ असोसिएशनच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. दरम्यान, 150 पेक्षा जास्त देशांमध्ये सदस्य आणि संपर्क असलेली जागतिक मानसिक आरोग्य संस्था या दिवशी, हजारो समर्थक मानसिक आजार आणि जगभरातील लोकांच्या जीवनावर होणारे त्याचे मोठे परिणाम याकडे लक्ष वेधण्यासाठी हा वार्षिक जागरूकता कार्यक्रम साजरा करण्यासाठी येतात.