मुंबई, 3 जानेवारी : मराठा आरक्षणासंदर्भातील आतापर्यंतची सर्वांत महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी –
मनोज जरांगे यांनी आता सरकारसोबतच्या चर्चेला पूर्णविराम देण्याची घोषणा केली आहे. आंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगे आणि मुंबई येथील मराठा आंदोलकांमध्ये बैठक पार पडली. याच बैठकीत बोलतांना मनोज जरांगे यांच्याकडून सरकारसोबत आता चर्चा न करण्याची घोषणा केली. मुंबईकर आणि माझ्यासह यापुढे कोणीही मराठा आंदोलक सरकारशी चर्चा करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
सरकारच्या अडचणीत होणार वाढ? –
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात मनोज जरांगे यांनी या प्रकारची घोषणा केल्यामुळे आता सरकारच्या अडचणीत वाढ होणार असल्याची बोललो जात आहे. दरम्यान, मराठा आरक्षणा संदर्भात जर चर्चाच बंद झाली तर मराठा आरक्षणावर तोडगा निघणार कसा?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मनोज जरांगे आज म्हणाले की, “20 जानेवारीला मुंबईकडे निघणार असून, तब्बल 2 कोटी मराठे मुंबईत दाखल होतील. आता मुंबईतल्या आंदोलकांच्या खांद्यावर मराठा समाजाची जबाबदारी आहे. तसेच इथून येणाऱ्या आंदोलकांची जबाबदारी मुंबईच्या आंदोलकांवर असणार आहे. आपल्याला चारही बाजूने घेरले, तर आपण 10 बाजूने घेरूयात, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
दीड लाख स्वयंसेवक तयार –
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, मुंबई आंदोलनासाठी दीड लाख स्वयंसेवक तयार करत आहोत. वकिलांची 200 जणांची टीम असून 1500 डॉक्टरांची टीम लागणार आहे. दीड महिन्याचे अन्न सुरूवातीला घेऊन जाणार आहे. मुंबईला जाताना रस्त्याने पिकांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. तसेच, मुंबईकर आणि माझ्यासह यापुढे कोणीही मराठा आंदोलक सरकारसोबत चर्चा करणार नाही,” असेही जरांगे म्हणाले आहेत.