मुंबई, 4 जानेवारी : नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे महत्वाची मागणी केली आहे.
राम कदम यांची मागणी –
अयोध्येत राम मंदिराचा 22 जानेवारीला प्राणतिष्ठा सोहळा होणार आहे. त्या दिवशी महाराष्ट्रात दारू- मांसावर बंदी घालावी, अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच संपूर्ण देशात दारू, मांसावर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी, असेही आमदार राम कदम यांनी म्हटले आहे.
श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात –
प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दिवस म्हणजेच 22 जानेवारी हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा ऐतिहासिक दिवस असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर 22 जानेवारीला सर्वांसाठी खुले होणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशभरातून भाविक अयोध्या नगरीत येऊ लागले आहेत. दरम्यान, अयोध्या शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.