नागपूर, 18 जानेवारी : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार असून या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. प्रभू श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या काही दिवसानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर अयोध्येत तब्बल 7 हजार किलो शिरा (हलवा) तयार करणार आहे.
काय नेमकी बातमी? –
राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याद्वारे अयोध्येत प्रभू श्री रामचरणी एक आगळावेगळा विक्रम अर्पण केला जाणार आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर शेफ विष्णू मनोहर हे तब्बल 7000 किलोचा विक्रमी शिरा तयार करणार आहे. या शिरासाठी तब्बल 15 हजार लिटर क्षमता असलेली आणि 2 हजार किलो वजनाची भलीमोठी कढई नागपूरमध्ये तयार करण्यात आली आहे.
हनुमान कढई –
शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केलेली ही कढाई देशातील सर्वात मोठी काढाई असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, लवकरच ही काढाई अयोध्येला जाण्यास सज्ज असणार आहे. 15 हजार लिटर क्षमता असलेली आणि 2 हजार किलो वजनाची देशातील सर्वात मोठी असल्याचे बोलले जात आहे. या कढईच्या आकारमान आणि भव्यतेवरून या कढईला ‘हनुमान कढई’ असे नाव देण्यात आले आहे. विष्णु मनोहरांच्या या संकल्पनेला नागपुरातील नागेश विश्वकर्मा यांनी अल्पावधीत सत्यात उतरवले आहे.
कढई नेमकी कशी आहे? –
7 हजार किलो शिरा बनविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हनुमान कढईचा व्यास 15 फूट आहे आणि तिची खोली 5 फूट आहे. कढई स्टीलची असून मध्यवर्ती भाग लोखंडाचा बनलेला आहे. जेणेकरून शिरा शिजवताना जळणार नाही. 22 जानेवारीला मुख्य सोहळा असल्याने सर्वसामान्यांना अयोध्येत प्रतिबंध आहे. यामुळे 24 ते 26 जानेवारीदरम्यान हे आयोजन करण्यात आल्याचे विष्णू मनोहर म्हणाले.
हेही वाचा : राम मंदिर सोहळा : अयोध्येतील भव्य दिव्य अशा प्रभू श्रीराम मंदिराची ‘अशी’ आहेत वैशिष्ट्ये