मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. यानंतर आता शरद पवार गटाला हा मोठा धक्का मिळाला आहे. यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार –
मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी आपल्या महाराष्ट्रात घडल्या. कोणत्याही पक्षाच्या घडामोडी घडल्यावर न्याय मागण्यासाठी परंपरेनुसार आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो. त्यामध्ये आम्ही आमचे म्हणणं माडलं. इतरांनीही माडलं. अनेक तारखा पडल्या. सर्वांचं म्हणणं आणि वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यावर साहजिकच लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं. आम्ही घेतलेल्या निर्णयाबाबत निवडणूक आयोगाने आज निर्णय दिला. निवडणूक आयोगाचा निकाल मी विनम्रपणे स्विकारतो. मान्य करतो. त्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो.
मी कुणाच्याही आरोपाला उत्तर द्यायला बांधील नाही. पण न्याय मागण्याचा अधिकार संविधानाने सर्वांना दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात कुणी गेल्यावर आम्हालाही आमची भूमिका तिथं मांडावी लागेल. आता आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जास्तीत जास्त जिल्हाध्यक्ष सुद्धा आहे. महानगरपालिकेला जिल्ह्याचा दर्जा दिला जातो. तिथेही सर्व अध्यक्ष हे आमच्याबरोबर आहेत. लोकशाहीमध्ये ज्याच्या बाजूने जास्त व्यक्ती असतात, तेच पक्ष चालवत असतात. केंद्राच्या योजना महाराष्ट्रात आणणे आणि नवीन पिढीसोबत वडिलधाऱ्यांना महाराष्ट्रासाठी प्रयत्नशील राहणे हा आमचा प्रयत्न राहील.
ज्यावेळी जे लोक आमच्यासोबत येतील, त्यांचं स्वागत करू. यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गाने जाण्याचा जाण्याचा आमचा मार्ग असेल. छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेऊन पुढे जाण्याचा आमचा मार्ग असेल, असेही ते यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?