मुंबई, 9 फेब्रुवारी : मुंबईतील दहिसरमध्ये काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची टीका करत संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले गृहमंत्री फडणवीस? –
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत माध्यमांसोबत बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना अतिशय दुःखद आहे. एका तरुण नेत्याचे असे निधन होणे गंभीरबाब आहे. ही घटना वैयक्तिक वैमनस्यातून झाली असून घटनेचा पोलीसांकडून सखोल तपास सुरू आहे. तपासातील सर्व बाबी निष्पन्न झाल्यानंतर लवकरत त्या सर्वांसमोर येतील. पण या घटनेचे कुणी राजकारण करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
राजीनाम्याबाबत काय म्हणाले? –
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर विरोधकांनी गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस काही वर्षे एकत्र काम करत होते. आपापसातील वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. माझ्यावर पूर्णपणे राजकीय आरोप आहेत. एखाद्या गाडी खाली एखादा श्वान आला तर ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असा टोला गृहमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना लावला.
काय आहे संपूर्ण प्रकरण? –
मुंबईतील दहिसरमध्ये काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. तसेच गोळीबार करणाऱ्या मॉरीस नोरोन्हानेही याने देखील स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांकडून तपास सुरू आहे.
हेही वाचा : ‘राजकारणात बाप बदलण्याची नवीन पद्धत आली आहे,’ रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या?