चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 5 मार्च : शरद पवारांना महाराष्ट्राने 50 वर्षे सहन केले, अशी टीका करत शरद पवारांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा, असे आवाहनही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ते जळगावात बोलत होते. जळगाव शहरातील सागर पार्कवर युवा संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित तरुणाईला त्यांनी संबोधित केले.
काय म्हणाले अमित शाह –
जळगावात आयोजित युवा संवादात संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, 2024 लोकसभा निवडणुकीबाबत मी बोलायला आलो आहे. येणारी निवडणूक ही 2047 ला विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत बनवणारी आहे. ही निवडणूक भारताच्या भविष्याची आहे. ही निवडणूक तरुणांची आहे. भाजपला मत म्हणजे तरुणाईला भविष्याला मत. भाजपला मत म्हणजे मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणे. तुमचे मत त्या पक्षाला द्या, जो पक्ष महान भारताची रचना करेल.
मला सांगा, जे पक्ष आपल्या पक्षांतर्गत लोकशाही ठेवत नाही, घराणेशाही ठेवतात, ती देशाच्या लोकशाहीला मजबूत करू शकतात का, असा सवाल करत त्यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. मोदीजींसमोर जे पक्ष आहेत, त्यामध्ये सोनिया गांधींना मुलाला पंतप्रधान बनवायचे आहे, उद्धव ठाकरेंना मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे, शरद पवार यांना मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे, ममता दीदाला आपल्या पुतण्याला मुख्यमंत्री करायचे आहे, एमके स्टॅलिन यांना आपल्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. यामध्ये तुमच्यासाठी काहीच नाही. तुमच्यासाठी नरेंद्र मोदी आहे. भाजप आहे. माझ्या देशाच्या तरुणाईच्या भविष्यासाठी विकसित भारताचे लक्ष्य ठेवले आहे. मोदीजींनी 10 वर्षात देशाला सुरक्षित करण्याचे कार्य केले. 10 वर्षात मनमोहनजी यांचे सरकार होते, तेव्हा शत्रूंचे हल्ला व्हायचे. पण मोदीजींचे सरकार आले तेव्हा पुलवामाच्या हल्ल्यानंतर 10 दिवसाच्या आत सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन दाखवला.
कलम 370 काँग्रेस पक्षाने 70 वर्षे लटकावून ठेवले. पण तुम्ही मोदीजींना दुसऱ्यांदा पंतप्रधान केले आणि 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 संपवले. मला संसदेत राहुल गांधी सांगायचे कलम 370 रद्द केल्यावर रक्तपात होईल. पण साधी पण दगडफेकसुद्धा कुणी करू शकले नाही. मोदीजींनी देशाला सुरक्षित केले. देशाला समृद्ध बनवण्याचे काम केले. मोदीजींनी जागतिक अर्थव्यवस्थेत देशाला पाचव्या क्रमांकावर आणले. मित्रांनो, मोदीजींनी 10 वर्षात डिजिटलपासून ड्रोन पर्यंत, एआयपासून लसपर्यंत प्रत्येक क्षेत्रात तरुणांसाठी दरवाजे खोलण्याचे काम केले. चूक करू नका. मुलाखतीमध्ये तुमचा बायोडाटा चेक केला जाईल, त्यानुसार पंतप्रधान पदाचा बायोडाटा पाहाल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच तुम्ही पसंती द्याल. मोदीजींजवळ बायोडाटाही आहे आणि पुढच्या 25 वर्षांचे व्हिजनही आहे.
गेल्या 10 वर्षात एक आठवड्याला एक विद्यापीठ, प्रत्येक दिवशी दोन कॉलेज, 55 पेटंट रजिस्टर झाले. प्रत्येक दिवशी दीड लाख तरुणांना मुद्रा लोन, प्रत्येक दिवशी 16 हजार कोटी डिजिटल ट्रान्जेक्शन झाले. 14 किमी रेल्वे ट्रॅक बनवला, 50 हजार गरीब महिलांना गॅस सिलेंडर दिले, प्रत्येक सेकंद एक गरीब कुटुंबाला नळापासून पाणी देण्याचे काम केले, असे सांगत त्यांनी शरद पवारांना महाराष्ट्राने 50 वर्षे सहन केले, अशी टीका करत शरद पवारांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मोदीजींना निवडून द्या –
मित्रांनो या जगात भितीला काहीच जागा नाही. फक्त ताकदच जगात सन्मान देते. त्यामुळे ताकदीने बाहेर या आणि तरुणांनी मतदान करावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना 400 पार करत निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राम मंदिर –
अयोध्येतील राममंदिराबाबत बोलताना ते म्हणाले की, राम मंदिर याआधी बनायले हवे होते की नको पण 70 वर्षे काँग्रेसने मतदानाच्या राजकारणासाठी रामलला टेंटमध्ये ठेवले. पण मोदींजींनी भूमिपूजनही केले आणि प्राणप्रतिष्ठाही केली. शिवाजी महाराजांच्या काळात काशी विश्वनाथचे मंदिर तोडले गेले होते. पण मोदीजींनी काशीविश्वनाथ कॉरीडॉर बनवण्याचे काम केले. ट्रिपल तलाक मोदीजींनी रद्द केले. 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 किलो अन्न फ्रीमध्ये दिले. 12 कोटींपेक्षा जास्त टॉयलेट बनवले. 4 कोटी लोकांना घर दिले. 14 कोटी लोकांना नळाने पाणी दिले. मुद्रा योजनेच्या माध्यमातून 24 लाख कोटींचे कर्ज दिले, असेही ते म्हणाले.
एकीकडे मोदीजी चंद्रावर चंद्रयान लॉन्च करत आहे, तर दुसरीकडे सोनियाजी 20वी बार राहुलबाबा लॉन्च करण्याचा प्रयोग करत आहेत. राहुलयान 19 वेळा लॉन्च झाले. मात्र, पोहोचले नाही. आता 20 व्यांदा प्रयत्न सुरू आहे, असे म्हणत घराणेशाहीवर त्यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात 3 पायांची एक ऑटो चालते, ज्याचे नाव महाविकास आघाडी आहे, या ऑटोचे तिन्ही पाय पंक्चर आहेत. महाराष्ट्राला पंक्चरवाली ऑटो विकास देऊ शकते का, असा सवाल करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वातील सरकार राज्याला विकासाच्या दिशेने नेऊ शकते, असे ते म्हणाले.
यावेळी मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील सदस्य मंत्री गिरीश महाजन, विजयकुमार गावीत, खासदार डॉ. हिना गावीत, सुभाष भामरे, उन्मेश पाटील, रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे, संजय सावकारे, राजेश पाडवी, काशीनाथ पावरा, मंगेश चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.