जळगाव, 28 मार्च : ज्यांच्याकडे स्वतःची ओळख, आधार कार्ड, रोजगार आणि आरक्षण नाही अशा कुष्ठरोग्यांचा आवाज ऐकणार कोण? आणि अशांचा मी प्रतिनिधी आहे. बाबांनी हा वारसा आम्हाला दिला. कुष्ठरुग्णांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. दीपस्तंभ फाउंडेशनचे दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासंदर्भातले कार्य बघून मी भारावून गेलो आहे, अशा भावना महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ.विकास आमटे यांनी व्यक्त केल्या.
राज्यस्तरीय दीपस्तंभ 2024 पुरस्काराचे वितरण बुधवारी दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल प्रकल्प, कुसुंबा, जळगाव येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास व्यासपीठावर.माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, भाऊसाहेब जाधव, डॉ सविता कुलकर्णी, पुखराज पगारिया, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते.
राज्यस्तरीय दीपस्तंभ 2024 पुरस्काराचे वितरण –
सेवाभावी काम करणाऱ्या तरुणांना व ज्येष्ठांना “दीपस्तंभ पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. समाजासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, प्रोत्साहन मिळावे व समाजासमोर एक आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात.
महारोगी सेवा समिति, वरोरा या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ भरीव सामाजिक योगदान दिल्याबद्दल डॉ.विकास आमटे यांचा दीपस्तंभ जीवन गौरव कृतज्ञता सन्मान करण्यात आला. जीवन गौरव कृतज्ञता सन्मान स्व.डॉ जगन्नाथ वाणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जातो. “दीपस्तंभ कर्मवीर सन्मान” शिक्षण क्षेत्रामध्ये तथा वंचीतांच्या शिक्षणासाठी विशेष भरीव योगदान देणारे मराठवाडा मित्र मंडळ, पुणे या संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांचा करण्यात आला.
“दीपस्तंभ विवेकांनद सन्मान” देशभरामध्ये कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी निर्माण होण्यासाठी योगदान देणाऱ्या “ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र, पुणे” यांचा करण्यात आला. सामाजिक कार्यासाठी पूर्ण वेळ झोकून देणाऱ्या तरुणांचा डॉ.विकास आमटे यांच्या हस्ते “दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. यात समाजबंध संस्थेच्या माध्यमातून महिला आरोग्य आणि मासिक पाळी या विषयावर कार्यरत सचिन आणि शर्वरी (सोलापूर), दिव्यांगासाठी डिजीटल माध्यम एक्सेसेबल करण्यासाठी कार्यरत असलेले कॉर्पोरेट वकिल अॅड.अमर जैन (ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश), तृतीयपंथीयांचे हक्क, न्याय आणि अधिकार या संदर्भात कार्य करणाऱ्या शमिभा पाटील (फैजपूर), महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी कार्यरत असलेले एकलव्य फाऊंडेशनचे संस्थापक राजू केंद्रे (लोणार, बुलडाणा), शांताई फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील अनाथ आणि निराधारांच्या पुनर्वसनासाठी आणि शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या अश्विनी वेताळ (कराड) यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या मनोबलच्या दिव्यांग, अनाथ व वंचित यशस्वी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. यात सुजित शिंदे – शिक्षण अधिकारी, मधुकर बिलगे- प्रमाणित शाळा निरीक्षक, राज- जे जे स्कुल ऑफ आर्टस्, मुंबई, दीपक सुसुंद्रे- राज्य कर निरीक्षक, सुदर्शन काळे- सहकार विभाग ऑडिटर, सुनील कुंढरे- ज्यु.इंजिनियर महानिर्मिती, योगेश पाटील – अर्थशास्त्र या विषयात क.ब.चौ.उ.म.वि. सुवर्ण पदक प्राप्त, भक्ती फंड- जलसंधारण अधिकारी, नारायण इंगळे – वन परिक्षेत्र अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.
ज्या गोष्टी समाज स्वीकारत नाही, दुर्लक्षित करतो त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. ज्या कुष्ठरोग्यांना समाजाने नाकारल, त्यांना समाजात उभं करण्याचं काम आनंदवनने केलं, त्या प्रेरणेतून दीपस्तंभ सारख्या अनेक संस्था महाराष्ट्रात उभ्या राहिल्या असे प्रतिपादन डॉ. के बी पाटील यांनी केले.
जगभरातल्या भरकटलेल्या नौकांना प्रकाश दाखवणारा दीपस्तंभ भौतिक नाही तर आंतरिक प्रकाश दाखवत आहे. संस्कृतीच्या रक्षणासाठी हे राष्ट्र एकसंघ रहायला हवे, यासाठी मातीवर प्रेम करायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कलाकार अविनाश नारकर यांनी केले.
सोहळ्यात संस्थेचे ज्येष्ठ देणगीदार कुमुदिनी पंडित, एच.डी.फायरचे मिहीर घोटीकर, लेफ्टनंट शिरीष देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. उत्तम कामगिरीबद्दल संस्थेचे सहकारी डॉ. किरण देसले, डॉ.हर्षल कुलकर्णी आणि मिलिंद पाटील यांचे कौतुकही या प्रसंगी करण्यात आले. सुव्यवस्था, पारदर्शकता व उत्तम व्यवस्थापनासाठी दीपस्तंभ मनोबलला आयएसओ सर्टिफिकेट या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.
संस्थेची प्रज्ञाचक्षु विद्यार्थिनी नाझनीन शेख हिने “माणसाने माणसाशी माणसासम वागणे” हे सुंदर गीत म्हटले तर अमित पन्हाळे या विद्यार्थ्याने मृदुंग वादन केले. प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी पुरस्कार देण्यामागची भावना आणि दिव्यांग, अनाथ आणि वंचितांसाठी उभारलेल्या राष्ट्रीय प्रकल्पाच्या भविष्यातील वाटचाली विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा.राम पाटील आणि मनोबलची ट्रान्सजेंडर विद्यार्थीनी वीणा काशीदने केले.