चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 1 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असताना भाजपच्या अधिकृत उमेदवार स्मिता वाघ यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनकडून नेमकी कोणाला उमेदवारी घोषित केली जाणार याबाबत दिवसेंदिवस नव्या चर्चा समोर येत आहेत.
काय आहे संपूर्ण बातमी? –
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्यावतीने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाटेला आला असताना अद्यापही अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, भाजपविरोधात प्रबळ उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून नवी रणनिती आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाकडून कोण? –
गेल्या काही दिवासांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी ठाकरे गटाकडून पक्षातील पदाधिकाऱ्यांसह भाजपमधील नेत्यांची चाचपणी सुरू आहे. यामध्ये सुरूवातीला ठाकरे गटातील कुलभूषण पाटील व हर्षल माने यांच्या नावाची चर्चा सुरू असताना ललिता पाटील यांनी भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यांचे नाव देखील चर्चेत आले.
ठाकरे गटाची रणनिती –
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे गेल्या 30 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वर्चस्व राहिले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधील नेत्याला आयात करून उमेदवारी दिली जावी, अशी रणनिती आखण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून केला जात आहे. यामध्ये उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांचे नाव चर्चेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाची जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईत पार पडली. दरम्यान, या बैठकीत जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराचे नाव निश्चित झाले असून उद्या किवा परवा ते नाव जाहीर होणार असल्याचे आता बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : उन्मेष पाटील नाराज? भाजपच्या खासदारकीच्या उमेदवार स्मिता वाघ यांचं महत्वाचं भाष्य