अमरावती, 2 एप्रिल : अमरावती येथील कैलाश नगरमध्ये राहणारे अनुराग मेश्राम यांना राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अनुराग मेश्राम हे 2008 पासून सतत मॉडलिंग क्षेत्रात कार्य करीत आहे . त्यांना या क्षेत्राची प्रचंड आवड असून त्यांनी आतापर्यंत 83 फॅशन आणि मॉडेलिंगचे दिग्दर्शक ( कोरियोग्राफर ) म्हणून काम केले आहे.
अनुराग मेश्राम यांचा परिचय –
अनुराग यांनी अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर परीक्षक (जज) म्हणून काम पाहिले आहे. दरम्यान, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन बुलडाणा फिल्म सोसायटीच्यावतीने दिला जाणारा ‘राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार 2024’ अनुराग मेश्राम यांना जाहीर झाला आहे. मॉडेलिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. पत्रकारितेचे शिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भारतीय जन संचार संस्थेत अनुराग यांचे पत्रकारितेचे शिक्षण झाले आहे.
बुलढाण्यात होणार पुरस्काराचे वितरण –
बुलडाणा फिल्म सोसायटी व वाडेकर फिल्म्सच्यावतीने राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार 2024 व बुलढाणा राष्ट्रीय लघुपट महोत्सव 2024 चे बुलढाणा येथे 7 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. श्री. शिवाजी महाविद्यालय, बुलढाणा येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमात अनुराग मेश्राम यांना राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.