अमळनेर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाचा शेतपिकांना मोठा फटका बसला आहे. काल शुक्रवारी झालेल्या अवकाळी गारपीठ व वादळाने अमळनेर तालुक्यातील आमोदे शिवारात प्रचंड नुकसान झाले. येथील शेतकऱ्यांचे मका, बाजरी, पपई, कांदा इत्यादी पिकांचे हाती आलेले उत्पन्न मातीमोल झाल्याने बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे.
गारपिटीने डोक्याला जखम –
यासोबतच या अवकाळी पावसाने काही घरांची पडझड झाली. यामुळे अनेक संसारपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. तसेच नागरिकांना दुखापती झाल्या आहेत. गारपिटीने तर वाल्मीक पाटील नावाच्या एका व्यक्तीच्या डोक्याला जखमही झाली आहे.
पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना फटका
या बेमोसमी आलेल्या पावसाने आमोदे शिवारात राजेंद्र साहेबराव पाटील यांच्या दोन एकर मका तसेच भाऊसाहेब निळकंठ पाटील यांची चार एकर पपई व कांदे यासोबतच बन्सीलाल मोहन पाटील, रोहिदास साहेबराव पाटील या शेतकऱ्यांच्या मका पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे होत तोंडी आलेला घास हिरवला गेल्याचे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
अशा या परिस्थितीत झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडून भरपाई मिळावी तसेच लवकरात लवकर पंचनामे व्हावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.