सुनिल माळी, प्रतिनिधी
17 एप्रिल, 2024 : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत असताना पारोळा तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून पारोळा तालुक्यातील चोरवड येथील राजेंद्र गजमल पाटील (वय 60 वर्ष) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.
काय आहे संपूर्ण बातमी? –
पारोळा तालुक्यातील चोरवड येथील शेतकरी राजेंद्र गजमल पाटील (वय 60 वर्ष) यांनी आज सकाळी 10:00 वाजेच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी काहीतरी विषारी द्रव्य सेवन केल्याचे त्यांची सून आरती पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच फोनवरून त्यांचे पती, राहुल राजेंद्र पाटील यांना सासरे राजेंद्र पाटील यांनी काहीतरी विषारी द्रव्य प्राशन केले असल्याचे कळवले. दरम्यान, राहुल पाटील यांनी तातडीने राजेंद्र पाटील यांना उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
मयत राजेंद्र पाटील यांचा मुलगा राहुल राजेंद्र पाटील यांनी पारोळा पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गजमल पाटील यांच्यावर चोरवड वि. का. सोसायटी चे जवळपास 60,000/- ₹ व हात उसनवारी चे 50,000/- ते 60,000/- ₹ कर्ज आहे. ते कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. दरम्यान, ह्या वर्षी अचानकपणे अवकाळी पावसामुळे उत्पनात घट आल्याने नैराश्य पोटी विषारी द्रव्य सेवन करत आत्महत्या केल्याचे सांगितले.
हेही वाचा : Jalgaon MIDC Fire : जळगाव एमआयडीसी आग प्रकरणी नवी अपडेट आली समोर