धरणगाव, 11 डिसेंबर : धरणगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. धरणगाव येथील प्राचार्यांची तब्बल सव्वा लाखात फसवणूक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर पतंजली योगा प्रशिक्षणाची बनावट जाहिरात देण्यात आली होती. त्यात धरणगाव येथील एका महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य यांची तब्बल 1 लाख 19 हजारात फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर मंगेश पाटील (वय-60, रा. हेमइंदू नगर, धरणगाव) असे फसवणूक झालेल्या प्रभारी प्राचार्याचे नाव आहे. ते धरणगाव येथील कला आणइ वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आहेत.
नेमकं काय घडलं –
किशोर पाटील यांनी 7 ऑगस्टला फेसबुकवर एक जाहिरात पाहिली. त्यात पतंजचील योगपीठ ट्रस्ट हरिद्वार या संस्थेच्या वतीने योगास आणि प्राणायामसाठी 7 दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे, असा उल्लेख करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचे शुल्क भरण्यासाठी पतंजली योगपीठ ट्स्ट युनिट 2 खात्याचा क्रमांकही देण्यात आला होता. यावर किशोर पाटील यांनी संपर्क साधला आणि याबाबतची माहिती घेतली.
तसेच यानंतर 7 ते 8 ऑगस्टला टप्प्याटप्प्याने त्यांनी ऑनलाईन स्वरुपात 1 लाख 19 हजार रुपये पाठवले. यानंतर संबंधित संपर्क साधल्यावर पैसे परत मागितले तर तिकडून टाळाटाळ व्हायला लागली. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे, असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत दोन जणांविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.