चंद्रकांत दुसाने, प्रतिनिधी
जळगाव : खान्देशातील जळगाव, रावेर आणि नंदुरबार या लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी होत असलेल्या प्रचाराच्या तोफा आज शनिवारी 11 मे रोजी सायंकाळी थंडावणार आहेत. आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांकडून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
परवा सोमवारी 13 मे रोजी जळगाव, रावेर आणि नंदुरबार या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. आज शनिवारी सायंकाळी 6 वाजेनंतर प्रचार बंद होणार आहे. तसेच सोशल मीडियावर केलेल्या जाहिरातीही दूर कराव्या लागणार आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सुवर्ण खान्देश लाईव्हच्या टीमने तीनही मतदारसंघांचा घेतलेला हा आढावा.
खान्देशातील मतदारसंघानिहाय उमेदवार –
जळगाव लोकसभा मतदारसंघ – जळगाव लोकसभा मतदारसंघात थेट शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये काट्याची लढत होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाला असून याठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण-पवार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापत भाजप नेत्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. उन्मेश पाटील यांचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मुंबई येथे शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला. तर करण पवार यांनीही उन्मेश पाटील यांच्यासोबत भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही बाजूच्या वतीने प्रचंड ताकदीने प्रचार केला जात आहे. अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा मतदारसंघात झाल्या. काल नितीन गडकरी यांचीही जळगावला सभा झाली. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा केला जात आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघ – रावेर लोकसभा मतदारसंघात थेट भाजप आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यामध्ये थेट काट्याची लढत होत आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाला असून याठिकाणी त्यांच्या पक्षाच्या वतीने श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यता आली. तर दुसरीकडे भाजपच्या दोन वेळच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवला आणि त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. यासोबतच त्यांचे सासरे आणि ज्येष्ठ राजकीय नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आणि लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. अद्याप त्यांचा भाजप पक्षप्रवेश सोहळा झालेला नाही. मात्र, त्यांच्या पुन्हा भाजपमध्ये आल्याने रक्षा खडसेंना बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे रक्षा खडसे यांच्या नणंद आणि एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या अद्यापही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षातच आहेत. मुक्ताईनगरमधून श्रीराम पाटील यांना लीड देण्याची आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूच्या वतीने प्रचंड ताकदीने प्रचार केला जात आहे. तसेच दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा केला जात आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ – नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता याठिकाही थेट भाजप आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आला असून याठिकाणी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे पूत्र गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपच्या वतीने विद्यमान खासदार डॉ. हिना गावीत यांच्यावर केंद्रीय नेतृत्त्वाने पुन्हा विश्वास दाखवत त्यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे डॉ. हिना गावीत आणि महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी अशी ही थेट लढत होणार आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खान्देशातील उमेदवारांच्या प्रचारासाठी नंदूरबार येथे सभा घेतली. तर आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची नंदूरबार येथे जाहीर सभा होत आहे. दोन्ही बाजूच्या वतीने प्रचंड ताकदीने प्रचार केला जात आहे. तसेच दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा केला जात आहे.
अशा परिस्थितीत महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान परवा 13 मे रोजी मतदार होणार आहे. यामध्ये खान्देशातील जळगाव, रावेर आणि नंदूरबार या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदार राजा नेमकं कुणाला कौल देतो, हे 4 जून रोजी निकालातून स्पष्ट होणार आहे.