ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 27 मे : खरीप हंगामाच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून परिसरातील प्रमुख पीक असणारे कापूस बियाणे सध्या बाजारांत उपलब्ध होत नसल्याने कापूस बियाण्याची टंचाई भासत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी प्रांताधिकारी यांना भाजप पदाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन दिले आहे.
काय म्हणाले अमोल शिंदे? –
अमोल शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करत शेती संदर्भातील समस्यांवर संवाद साधला. ते म्हणाले की, पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी खरीप हंगाम लागवडीच्या तयारीला लागले आहेत. तसेच आपल्या शेतीची मशागत करून लागवडीसाठी त्यांना कापूस पिकांच्या बियाण्याची टंचाई भासत असल्याने पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
शेतकऱ्यांची दिशाभूल –
अमोल शिंदे पुढे म्हणाले की, गेल्या काळात देखील दुष्काळ सदृश्य तालुक्याच्या नावाने पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल झाली आहे. शेजारील चाळीसगाव तालुक्यातील माझे मित्र आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून घेण्याकरिता विशेष प्रयत्न करून जवळपास 133 कोटीचे पॅकेज चाळीसगाव तालुक्याला मंजूर करून घेतले. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना भरीव अशी मदत शासनाकडून मिळाली.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली –
मात्र, पाचोरा येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त न करून घेता, फक्त दुष्काळ सदृश्य घोषित झाला असल्याचे सांगत येथील शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसली आहेत. त्याचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने फायदा झाला नसून येथील शेतकरी आजही मदतीच्या आशेवरच आहेत. दरम्यान, आता अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या ऐन खरीप हंगामाच्या लागवडीला सुरुवात झाली असताना, शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होत नसल्याचे शिंदे यांनी बोलताना सांगितले.
अन्यथा रस्त्यावर आंदोलन करू –
शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात भाजपच्यावतीने यासंदर्भात उपविभागीय अधिकारी पाचोरा व तालुका कृषी अधिकारी पाचोरा यांना निवेदन देऊन याबाबतीत तात्काळ सूचना कराव्यात व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे कसे उपलब्ध करून देता येईल अशा उपाययोजना करून तात्काळ बियाणे टंचाई दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, मागण्या पुर्ण न झाल्यास सत्तेतील पक्षात असताना देखील पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे यावेळी अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, सरचिटणीस बन्सीलाल पाटील, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा पदाधिकारी अरूण पवार, शहर सरचिटणीस समाधान मुळे, जगदिश पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश ठाकूर, युवा मोर्चा चिटणीस अमोल नाथ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : “देशाला फूलटाईम कृषी मंत्री नाही, अन् कृषीप्रधान देश म्हटला जातो”, उन्मेश पाटील यांची सरकारवर टीका