चोपडा, 28 मे : जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा 45 अंशाच्या वर गेला असताना नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. असे असताना उन्हाच्या बचावापासून तसेच वीजेवर चालणाऱ्या उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढल्याने याचा परिणाम वीजेवर होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात भारनियमन (लोड शेडिंग) सुरू आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
जळगाव जिल्ह्यात भारनियमन सुरू झाल्याने पिकांसाठी आवश्यक असणारा वीजपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्याने अनोखे आंदोलन सुरू केले. चोपडा येथील शेतकरी उर्वेश साळुंखे यांनी वीज वितरण कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, त्यांच्या या आंदोलनाची आता जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
शेतकऱ्याचे झोपा काढा आंदोलन –
गेल्या महिन्याभरापासून तापमान हे उच्चांकी पातळीवर असल्याने शेती पिकाला पाण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अंवरदे गावातील शेतकरी उर्वेश साळुंखे यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणी केली आहे. दरम्यान, गावातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तसेच कार्यालयाच्या दारातच त्या शेतकऱ्याने झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे.
जिल्ह्यात लोड शेडिंग –
विजेची वाढती मागणी वीज वितरणकडून पूर्ण होत नसल्याने वीज वितरण कंपनीकडून जिल्हाभरात अनेक ठिकाणी लोड शेडिंग करत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचा परिणामामुळे शेतपीके करपू लागली आहेत. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, नाशिकमधून तीन जणांना पोलिसांनी केली अटक