जळगाव, 9 जून : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मान्सून हा राज्यात दाखल झाला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट तर रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पडणाऱ्या पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
उत्तर महाराष्ट्राचा हवामान अंदाज –
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला. तसेच जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात देखील पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबईत पावसाला सुरूवात –
मुंबईत पहाटेपासून ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, मुंबईतील पावसाच्या संततधाराचे परिणाम लोकल रेल्वेच्या सेवेवर झाला आहे. मुंबईत पहिल्याच पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील 3 ते 4 तास मुंबईमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
हेही वाचा : modi 3.0 : पंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधी नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या समाधीस्थळी नतमस्तक