चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आज एनडीए सरकार शपथविधी होणार आहे. यामध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. दरम्यान, पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी आज सकाळीच नरेंद्र मोदी हे राजघाट येथे पोहोचले. याठिकाणी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

यानंतर नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळ सदैव अटल याठिकाणी जाऊन त्यांना अभिवादन केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय समर स्मारक, वॉर मेमोरिअल याठिकाणीही जाऊन शहिदांना अभिवादन केले. आज सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असा हा दौरा होता.

आज सायंकाळी शपथविधी सोहळा –
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहे. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी देशासह परदेशातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीत सुरक्षेचा अत्यंत चोख असा बंदोबस्त करण्यात आला आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी –
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारमध्ये महाराष्ट्रातूनही काही महत्त्वाच्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, मुंबईतून लोकसभेवर गेलेले पीयूष गोयल, रामदास आठवले, उदयनराजे भोसले, शिवसेनेकडून (शिंदे गट) प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून प्रफुल्ल पटेल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जे मंत्री आज शपथ घेतील त्यांना आधी या संबंधित माहिती देण्यासाठी फोन केला जाईल. त्यांच्यासाठी चहापानाचा कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहे.