चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सरकारकडून अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये युवक-महिला तसेच शेतकऱ्यांसदर्भात अजित पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या गेल्याचे दिसून येत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा अर्थसंकल्प सादर केला जात असल्याने सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा –
राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशनात मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी या योजेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार असून या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल.
स्त्री ही कुटुंबाचा आधार असून एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. या महिलांना संधी उपलब्ध करून देणे, ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच आमच्या लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मी घोषणा करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटलंय.
हेही वाचा : IAS Ayush Prasad Interview : लासगाव बरडी सोलर प्रकल्प, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काय म्हणाले?