संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 3 जुलै : जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पारोळा तालुक्यातून अपघाताची बातमी समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील टेहु शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जखमी झाले आहेत.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील टेहू शिवारातील वाकड्या पुलापासून 200 मीटर अंतरावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले. श्याम संभाजी पाटील (वय 28, टेहू, ता. पारोळा) असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
तरूणाचा जागीच मृत्यू –
पारोळा शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या टेहू शिवारातील वाकड्या पुलाच्या जवळ सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास श्याम संभाजी पाटील हा तरुण दुचाकीने (एमएच 19 /एझेड 3676) येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीवरील एमएच 20 /सीएल 4640) चालक विनोद विठ्ठल महाले (पारोळा) याने जोरदार धडक दिली. त्यात श्याम संभाजी पाटील याचा जागीच मृत्यू झाला.
जखमींवर उपचार सुरू –
दरम्यान, या अपघातात विनोद महाले व समाधान कैलास अहिरे हे दोघे जखमी झाले. यानंतर त्यांना लगेच 108 रुग्णवाहिकेने पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी काल मंगळवारी रोजी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये संजय राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारने केले ‘हे’ महत्त्वपुर्ण बदल