जळगाव, 8 जुलै : महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून सर्वदूर पाऊस पडतोय. मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असून राज्याच्या काही भागांमध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोलमडलीय तर काही भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे.
राज्यभरात मुसळधार पाऊस –
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु असून या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला आहे. नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, परभणी, बुलढाणा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, नागपूरसह इतर बहुतांश जिल्ह्यातील नदी नाल्यासह मुख्य रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी घोषित करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही सुट्टीची घोषणा केली.
मुंबईत जनजीवन विस्कळीत –
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून लोकल सेवेवरही याचा परिणाम झालाय. दरम्यान, पुढचे तीन ते चार तास मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही भागात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पुढील दोन पाऊसाचा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच हवामान विभागाकडून राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा : मुंबईत मुसळधार पाऊस; लोकलवर परिणाम, जळगाव जिल्ह्याचा काय आहे हवामान अंदाज?