अकोला, 7 जुलै : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात काल शनिवारी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या चकमकीत दोन जवान शहीद झाले. यामध्ये अकोल्यातील मोरगाव भाकरे गावातील भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असलेला वीर जवान प्रवीण जंजाळ शहीद झाला.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलातील जवानांनी चार दहशतवाद्यांचा संपवले. दरम्यान, यामध्ये दोन जवानांना वीरमरण आले. यात मोरगाव भाकरे गावातील जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ हे शहीद झाले. दरम्यान, शहीद जवानाच्या निधनाची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली.
चार दहशतवाद्यांचा खात्मा –
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दोन ठिकाणी लष्कर आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली. कुलगामच्या फ्रिसल चिन्निगाम भागात घेरावबंदी तसेच शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांशी चकमक झाली. यामध्ये जवानांना चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय. दरम्यान, आणखी चार दहशतवादी लपून बसल्याचा देखील संशय आहे.
चार महिन्यांपुर्वीच काश्मिरात पोस्टिंग –
प्रवीण जंजाळ हा सेकंड महार रेजिमेंटमध्ये 2020 मध्ये भरती झाला होता. त्याची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती. दरम्यान, चार महिन्यांपुर्वीच सैन्यदलाच्या राष्ट्रीय रायफलच्या (विशेष दस्ता) क्रमांक एकच्या तुकडीत कुलगाव जिल्ह्यात त्याला पाठविण्यात आले होते. या पथकासोबतच कुलगाव जिल्ह्यातील मोरडगम येथे शनिवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात अंदाधुंद प्रविणच्या डोक्याला गोळी लागल्याने तो शहीद झाल्याची माहिती आहे.
गावावर पसरली शोककळा –
प्रविण जंजाळ शहीद झाल्याची माहिती रेजिमेंटतर्फे कुटुंबियांना देण्यात आली. रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी मोरगाव भाकरे येथील सरपंच उमाताई ज्ञानेश्वर माळी यांच्यासोबत संपर्क साधून प्रवीणच्या कुटुंबीयांशी संपर्क केला व प्रवीण शही झाल्याची माहिती कुटुंबीयांना कळविण्यात आली. दरम्यान, या दुःखद घटनेमुळे जंजाळ कटुंब व मोरगाव भाकरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
हेही वाचा : मोठी बातमी! नाशिकमध्ये एसीबीचा ट्रिपल धमाका, एकाच दिवशी तीन लाचखोरांना पकडले रंगेहाथ