संदीप पाटील प्रतिनिधी
पारोळा, 17 ऑगस्ट : कोलकता येथे वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ आज पारोळा येथे एक दिवसाचा संप पुकारण्यात आला. दरम्यान, पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी पारोळा डॉक्टर असोसिएशनकडून पोलिसांना निवेदन देण्यात आले.
काय आहे संपुर्ण बातमी? –
कोलकाता येथील आर.जी.कार मेडिकल कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनचे वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा 9 ऑगस्ट 2024 रोजी ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. दरम्यान, या घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे ,याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संप केला. तसेच डॉक्टर असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चा आयोजित केला आहे.
सदरील गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरले. आर.जी. कार महाविद्यालय प्रशासन व पोलीस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला म्हणजेच सीबीआय हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
पारोळा डॉक्टर्स असोसिएशनचा संप –
आर जी कार मेडिकल कॉलेजला 15 ऑगस्ट 2024 रोजी मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेले जागेची ही तोडफोड करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, सदरील गुन्ह्यातील समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारा विरोधात पारोळा डॉक्टर्स असोसिएशनने 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 18 ऑगस्ट 2024 सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासाच्या वैद्यकीय सेवा बंदीचे आव्हान करण्यात आले आहे.
पोलिसांना निवेदन –
त्यात अत्यावश्यक व आपातकालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. सर्वपॅथी व असोसिएशनचे सर्व देशवासीयांना या पीडित महिला डॉक्टरचा कुटुंबीयास न्याय मिळवून देण्यासाठी या संपात समर्थन देण्याची विनंती सर्वानुमते करण्यात आली आहे. डॉक्टर्स व हॉस्पिटल वर होणाऱ्या हल्ल्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून कायद्यात बदल करण्याचा आग्रह केंद्र शासनाकडे करण्यात यावा, अशी मागणी पारोळा तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या महिला डॉक्टर्स व पुरुष डॉक्टर्स यांच्या वतीने पारोळा पोलीस निरीक्षक सुनिल पवार, उपनिरीक्षक राजु जाधव व पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी यांना करण्यात आली. यावेळी पारोळा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सह महिला डॉक्टर व पुरुष डॉक्टर्स व सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा : शेतकऱ्यांचा प्रांताधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा; नारपारसाठी आता आरपारची लढाई – उन्मेश पाटील