अमरावती, 13 जानेवारी : वाशिम येथील भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक आणि संपूर्ण महाराष्ट्रात कवी व गझलकार म्हणून ख्यातनाम असलेले श्री. चंद्रशेखर भुयार यांच्या “समाधी” या बहुप्रतिक्षीत गझल संग्रहाचे येत्या रविवारी अभियंता भवन येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन होत आहे.
अष्टगंध प्रकाशन द्वारे प्रकाशीत या गझल संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान विधान परिषदेचे आमदार श्री. श्रीकांत भारतीय हे भूषविणार असून हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध हिंदी उर्दू गझलकार डॉ. गणेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सकाळी 10 ते 12 या वेळेत संपन्न होणाऱ्या प्रकाशन समारंभाला बुलढाण्याचे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रा. सदानंद देशमुख, मसासंम सदस्य पुष्पराज गावंडे, बुलढाण्याचे प्रा. डॉ. गोविंद गायकी, अमरावतीचे नाना लोडम, वर्धेचे संजय इंगळे तिगावकर, अंकुर साहित्य संघ, अकोलाचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मत ढाले, अमरावतीचे माजी नगरसेवक तुषार भारतीय, मालखेड रेल्वेचे ललित कदम व अमरावतीचे मराठी, हिंदी व उर्दू गझलकार अनंत नांदूरकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
प्रकाशन सोहळ्यानंतर दुपारी 1 ते 6 या वेळेत संपन्न होणाऱ्या गझल वैदर्भी या मराठी गझल महा मुशायऱ्याचे अध्यक्षस्थान अहमदनगरचे माधव सावंत भूषविणार आहेत. तर मुशायऱ्याचे सूत्रसंचालन गझलकार प्रफुल्ल भुजाडे, विद्यानंद हाडके, गोपाल मापारी व प्रा. डॉ. रवी चापके करणार आहेत.
या मान्यवर गझलकारांचा सहभाग राहणार –
या महा मुशायऱ्यात बबन धुमाळ, मसूद पटेल, सतिश माळवे (सर्व पुणे), रविंद्र ठाकुर, अनिल जाधव, अनंत नांदूरकर, नितीन भट, नितीन देशमुख, निर्मला सोनी, ओमप्रकाश ढोरे, चंद्रशेखर तारे, शरद काळे (सर्व अमरावती जिल्हा), सतिश दराडे (बीड), डॉ. राज रणधीर (जालना), गजानन दरोडे (महागाव), जयप्रकाश सोनुरकर, प्रीती वाडीभस्मे, महेन महाजन, रुपेश देशमुख (सर्व वर्धा जिल्हा), एजाज खान, जगन अवचार (सर्व बुलढाणा जिल्हा), प्रिती जामगडे (चिमुर), जीवन धेंडे (बार्शी, सोलापुर), राजेश देवाळकर (बल्लारशा), रवी धारणे ( चंद्रपुर), सुरेश शेंडे (गडचिरोली), मंगेश गजभिये (बार्शी टाकळी, अकोला), सुनिल ठाकुर (मुर्तिजापुर), सुरेश धनवे (पुसद), राजु आठवले (सिल्लोड, जालना), विनोद बुरबुरे (यवतमाळ), धनंजय तांदळे (अहमदनगर) या मान्यवर गझलकारांचा सहभाग राहणार आहे.
चंद्रशेखर भुयार यांची गझल साध्या सोप्या सरळ भाषेत बहुतांशी थेट सामाजीक प्रहार करणारी म्हणून ख्यातिप्राप्त आहे. त्यांचा ‘समाधी’ हा गझल संग्रह गझलेच्या अंगाने पुर्णत: गोटीबंद संग्रह असून विदर्भाच्या सांस्कृतिक राजधानी अमरावती येथे तो लोकार्पित होत आहे. मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर गंभीर चिंतनाअंती प्रकाश टाकणारा हा संग्रह असून मानसिक व भावनिक स्तरावर परिपक्व भाष्य करणारा आहे. प्रख्यात साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांची प्रस्तावना लाभलेला हा गझल संग्रह एका चिंतनशिल व बहुआयमी गझलकाराशी आपली भेट घडवतो. या कार्यक्रमाला अधिकारी वर्ग व गझल रसिक मोठ्या प्रमाणात उपस्थीत राहणार आहेत.