जळगाव, 16 सप्टेंबर : रिमांड होम मधील मुलांच्या कला गुणांना वाव म्हणून त्यांना रांगोळी, चित्र काढणे, ढोल वाजवीणे अशा कलांना प्रोत्साहन देण्याची कृती म्हणजे एका अर्थाने त्यांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देणे आहे, असे अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक राज्य मानवाधिकार आयोगाचे चेअरमन न्यायाधीश के. के. तातेड यांनी केले. राज्य मानवाधिकार आयोगाचे चेअरमन यांनी आज जिल्हा पेठ पोलिस स्टेशन, रिमांड होम आणि कारागृहाला भेट देऊन पाहणी केली.
जिल्हा पोलिस स्टेशन भेट –
जिल्हा पोलिस स्टेशन भेटीत त्यांनी पुरुष बंदी, स्त्री बंदी यांच्या बे्रेक्सला भेट दिली. त्यांना दिलेल्या मूलभूत सुविधांची पाहणी केली. स्त्री बंदी च्या सुरक्षितते बाबत अधिक दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. यावेळी स्टेशन नोंद वही, गुन्हेगार नोंद वहीची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डीसोबत होते.
सुधारगृहाला भेट –
बाल सुधारगृहाच्या भेटीत त्यांनी इथल्या मुलांच्या बरोबर संवाद केला. त्यांना जेवण कसे मिळते याची विचारपूस केली. त्यांच्या राहण्याची व्यवस्था पाहिली. त्यांचा अभ्यास त्याच बरोबर ते करत असलेले इतर कार्यानुभवही त्यांनी जाणून घेतले. मुलींच्या तिथे त्यांच्या स्वयंपाक घरात जाऊन पाहिले, मुलींनी काय नाष्टा केला विचारले. यावेळी मुलींनी काढलेले पेंटिंग, गार्डन काम त्यांनी पाहिले. यावेळी मुलं आणि मुली यांनी ढोल वाजविले. जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष घालून इथे सुविधा पुरविल्यामुळे या मुलांना ही साधन उपलब्ध करून देता आली हे यावेळी सांगितले. या कृतीचे चेअरमन न्यायाधीश के. के. तातेड यांनी विशेष कौतुक केले.
कारागृहाला भेट –
जिल्हा कारागृहाच्या भेटीत त्यांनी स्त्री बंदीची भेट घेवून त्यांना ज्या देय सुविधा आहेत त्या मिळतात का याची विचारपूस केली. स्वयंपाकाच्या ठिकाणी जाऊन जेवणाचा दर्जा पाहिला. पुरुष बंदीना भेटून त्यांच्या काही तक्रारी आहेत का जाणून घेतल्या. नियमांनुसार घरच्यांशी संवाद करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा कारागृह प्रशासनाला यावेळी दिले. त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी यांनी दिला आढावा –
राज्य मानवाधिकार आयोगाचे चेअरमन यांनी केलेल्या या पाहणी नंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मानवाधिकारांशी संबंधित 15 बाबींचे सादरीकरण यावेळी केले. त्यात प्रामुख्याने पोलिस विभाग, सामाजिक न्याय, दिव्यांग, तृतीय पंथी, आरोग्य, महिला आणि बालकल्याण,ज्येष्ठ नागरिक, सेक्स वर्कर यांच्या बाबत झालेल्या कामाची माहिती यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली.
या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.