मुंबई, 29 सप्टेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही अवघ्या काही दिवसांवर आली असताना महायुती असो महाविकास आघाडीत जागावाटपासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत महत्वाची बैठक पार पडली. साधारणपणे साडेचार तास बैठक चालल्याने महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटणार का?, असा सवाल उपस्थित केला जातोय.
महायुतीची जागावाटपाबाबत बैठक –
महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर साधारणपणे साडेचार तास बैठक पार पडली. या बैठकीत स्टँडिंग सीट तसेच तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा केली गेल्याची माहिती समोर आली आहे. तीन पक्षांचा दावा असलेल्या जागांवर कुठला उमेदवार उजवा ठरू शकतो, तिथली राजकीय आणि जातीय समीकरणे याचाही विचार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
जिंकूण येणाऱ्या जागा किती, कुठल्या जागांवर अधिक मेहनत घेणे गरजेचे आहे. या मुद्यांवर महायुतीच्या बैठकीत विचार करण्यात आला आहे. निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्या मुद्यांवर भर द्यायला हवा, कुठले वादग्रस्त मुद्दे प्रकर्षाने टाळायला हवेत. वचननाम्यात नागरिकांशी निघडीत मुद्यांना प्राधान्य असायला हवे, या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे, आदी उपस्थित होते.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview