एरंडोल, 17 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कार आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातामध्ये 1 युवक गंभीर जखमी झाला आहे. जळगावकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणारी कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे.
भीषण अपघाताची ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावापासुन थोड्या अंतरावर काल (सोमवारी) संध्याकाळच्या सुमारास घडली.
काय आहे संपूर्ण बातमी –
मर्सिडीज कार क्रमांक एमएच15 एचवाय 0700 ही जळगावकडून नाशिककडे भरधाव वेगाने जात होती. या गाडीने नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीस धडक दिली. त्यात नितिन जामसिंग पाटील (वय 21) आणि घनश्याम भानुदास बडगुजर (वय 20) या दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच एक 22 वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला आहे. ज्ञानेश्वर गणसिंग पाटील, असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा – पतंग उडवतांना विहिरीत पडला, धरणगाव तालुक्यात पाचवीतील मुलाचा मृत्यू
गंभीर झालेल्या तरुणाचे चार दिवसांवर लग्न –
दरम्यान, या अपघातानंतर माजी जि.प.सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, अशोक पाटील, राजेंद्र पाटील, मनोज पाटील, हरीभाऊ महाजन, अशोक बडगुजर आणि इतर ग्रामस्थांनी मदतकार्य केले. जखमी झालेल्या ज्ञानेश्वर पाटील या तरुणाला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. ज्ञानेश्वर पाटील हा 21 जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार होता. त्याआधी हा दुर्दैवी अपघात झाला.