ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 30 ऑक्टोबर : परतीचा पाऊस न झाल्याने आपल्या पाचोरा भडगाव मतदार संघातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या कापसाची अवस्था अंत्यत वाईट आहे. त्यामुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील आणेवारी 50 पैशाच्या आत आली पाहिजे, अशा पद्धतीचा अंतिम अहवाल आपण प्रांताधिकारी किंवा तहसीलदारांपर्यंत द्यावा, त्याच पद्धतीचा सर्व्हे आपण करावा, अशा सूचना आमदार किशोर पाटील यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
“आमदार आपल्या दारी” कार्यक्रमाला सुरुवात –
पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या यांच्या प्रयत्नातून मौजे सातगाव डोंगरी येथे मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा व लोकार्पण सोहळा आज सोमवारी पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे आयोजित करण्यात आला होता. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाप्रमाणेच आमदार आपल्या दारी या कार्यक्रमाची घोषणा आमदार किशोर पाटील यांनी केली होती. आज सातगाव डोंगरी येथे आमदार किशोर पाटील यांच्या आमदार आपल्या दारी या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी सातगाव डोंगरी येथे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व रस्त्याचे उद्धघाटन करण्यात आले. तसेच आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले.
आमदार किशोर पाटील नेमकं काय म्हणाले? –
मतदार संघातील आणेवारींसंदर्भात बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, जवळपास 7 वर्षांपासून पाचोरा भडगाव या दोन्ही तालुक्यातील आणेवारी ही 50 पैशांच्या आत लागू झाली आहे. आता जर आपण पाहिलं तर हे वर्ष इतकं कठीण आहे की, आधी पाऊस झाला पण परतीचा पाऊस आपल्याकडे नाही. कापसाला 10-12 कैऱ्यांच्या पलीकडे काही दिसत नाही. जे उत्पन्न कापसाला एकरी 7-10 क्विंटल यायला हवं ते 3 ते 4 एकरी येत आहे, इतकी वाईट अवस्था कापसाची आहे. पण असं असताना मी आणेवारी समजू शकतो. पण दुसरीही आणेवारी 50 पैशांपेक्षा जास्त. अजून आपली तिसरी अंतिम आणेवारी राहिली आहे. तलाठी असतील, कृषीसेवक असतील आणि ग्रामसेवक असतील, जी तुमची टीम आहे, तुम्ही गावांमध्ये फिरुन, त्या त्या शेतांमध्ये जाऊन, नेमकी काय परिस्थिती आहे ती पाहा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
आमदारांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना –
एखादा बागायतदार सोडा, पण कोरडवाहू शेतकऱ्यांना 25 टक्केसुद्धा उत्पन्न येणार नाही. परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील आणेवारी 50 पैशाच्या आत आली पाहिजे, अशा पद्धतीचा अंतिम अहवाल आपण प्रांताधिकारी किंवा तहसीलदारांपर्यंत द्यावा, त्याच पद्धतीचा सर्व्हे आपण करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
आणेवारीचा विचार करावा –
आपल्या तालुक्यातील मागील 5 ते 7 वर्षातील हे पहिलं वर्ष असं असे ज्यात परतीचा पाऊस आला नाही. तो यायची शक्यताही नाही. चाळीसगाव तालुक्याचा विचार केला असता 70 गावांमध्ये पाण्यासाठी टँकरची आवश्यकता आहे, अशी बिकट अवस्था आहे. त्यामुळे सर्व अधिकारी बांधवांनी या आणेवारीचा विचार करावा, अशी विनंतीही यावेळी आमदार किशोर पाटील यांनी केली.
विविध समस्या मार्गी लावा –
शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात. त्या लोकापर्यंत पोहोचाव्यात म्हणून याठिकाणी जागेवर अर्ज स्विकारण्यासाठी पंचायत समितीचे तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच यावेळी जागेवर समस्यांचे निराकरण आणि अधिकारी कर्मचारी आदेश देऊन समस्या मार्गी लावा, असे आदेश देण्यात आले.
मी 100 किलोमीटरचे शेतरस्ते मंजूर केले –
या कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, आज 90 टक्के गावांमध्ये शेतरस्त्यांची अडचण आहे. मी मागील एक ते सव्वा वर्षांपासून मी 100 किलोमीटरचे शेतरस्ते मातोश्री पालनच्या माध्यमातून मंजूर केले आहेत. असे असताना एकही रस्त्याचे काम माझ्या माहितीप्रमाणे अजून चालू झालेले नाही आणि अतुल पाटील बीडीओ असताना शासन आपल्या कार्यक्रमाच्या आधी मी सर्व्हे केला तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की 35 किलोमीटरच्या वर्क ऑर्डर आपल्या तयार आहेत. पण मग ते 35 किलोमीटरचे रस्ते नेमके कुठले कुठले आहेत, त्यामध्ये सातगावचा रस्ता मंजूर झाला आहे का, नसेल तर का झाला नाही, वर्क ऑर्डर आहे तर मग काम का चालू झालं नाही, या गोष्टींचा पण आपण तत्काळ विचार करावा, असे ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी सरपंच उषाताई सुभाष पाटील, उपसरपंच शकीलाताई तडवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, युवासेना तालुकाप्रमुख योगेश पाटील, वाडी येथील शेखर पाटील, शंकर बाजीराव पवार, युवराज पाटील, भागवत पाटील, समाधान पाटील , मुख्याध्यापक मनगटे सर, अशोक पाटील, अशोक तडवी, सोनजी पाटील, अब्बास तडवी, सुभाष पाटील, नाना भाऊ अहिरे, सिकंदर भाऊ तडवी, सागर भाऊ, भिला पवार, अण्णा मराठे, आबा बच्चे, शंकर पवार, गोकुळ परदेशी, अशोक गायकवाड तसेच रईसाबई तडवी, सतीश बाजीराव पाटील, आबा भगवान राठोड, आप्पा रामदास पाटील, आकाश भाऊ, सागर चौधरी, अंबादास अल्ल्हात, रज्जाक तडवी तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र पाटील व शिक्षक शिक्षिका, तसेच ग्रामपंचायत सदस्य व विविध विकास कार्यकारी सोसायटी सदस्य, ग्रामसेवक, पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे आणि पोलीस कर्मचारी शिवसेना-युवासेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास वाघ यांनी केले.