मुक्ताईनगर, 16 मे : जिल्ह्यात लाचप्रकरणाच्या अनेक घटना ताज्या असताना मुक्ताईनगरातून ग्रामसेवकाने लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत शिपायाला 6 हजार रूपयांची लाच घेताना जळगाव येथील लाचलुचपत विभागाने काल रंगेहात अटक केली. मनोज सूर्यकांत घोडके असे ग्रामसेवकाचे तर सचिन अशोक भोलाणकर असे शिपाईचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील तक्रारदारच्या आईच्या नावावर घर व प्लॉट आहे. दरम्यान, आईच्या नावे असलेल्या मालमत्तेवर ग्रामपंचायत दप्तरी मुलाचे नाव फेरफार करण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, ती फेरफार करण्यासाठी ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके याने तक्रारदारास 11 हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान, तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई –
राजुरा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके आणि शिपाई सचिन अशोक भोलाणकर यांनी तक्रारदाराकडून ठरलेल्या 11 हजारांपैकी सहा हजार रूपयांची लाच स्वीकारली. दरम्यान, त्याचवेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांच्यावर सापळा रचत लाच स्वीकारलेली सहा हजारांची रक्कम हस्तगत करून दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत यांचा समावेश –
मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा ग्रामपंचायतीत केलेल्या कारवाईत पर्यवेक्षक अधिकारी म्हणून लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पो. नि. अमोल वालझाडे, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पो. ना. किशोर महाजन, पो. ना. बाळू मराठे, पो. कॉ. प्रणेश ठाकूर, पो. कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. अमोल सूर्यवंशी, पो. कॉ. सचिन चाटे यांच्या पथकाने कारवाई केली.
हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.