अमळनेर, 30 जून : राज्यात सध्या महाराष्ट्र पोलीस दलासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस भरतीतील उमेदवारांच्या मैदानी चाचण्या घेतल्या जात असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात मैदानी चाचणीसाठी गेलेल्या तरूणाचा पोलीस भरतीदरम्यान धावताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच धुळ्यातील एकाला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील बालेगाव येथे सुरू असलेल्या पोलिस भरती दरम्यान धावताना अमळनेर येथील तरुणाचा धाप लागून काल 29 जून रोजी मृत्यू झाला. अक्षय मिलिंद बिऱ्हाडे (वय 24) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर दुसरीकडे धुळ्यातील प्रेम ठाकरे याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
धावताना आली भोवळ अन् जमिनीवर कोसळला –
अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील अक्षय मिलिंद बिऱ्हाडे हा तरुण सध्या प्रताप महाविद्यालयात कला शाखेच्या अंतिम वर्षाला होता. तसेच त्याने पोलीस भरतीसाठी सराव सुरू केला होता. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील बालेगाव येथे 27 जून रोजी पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी तो गेला होता. मात्र, 29 जून रोजी मैदानी चाचणीसाठी धावत असताना 3 ते 4 राऊंडनंतर त्याला भोवळ आल्याने तो जमिनीवर कोसळला.
आई-वडिलांना दुःख अनावर –
यानंतर ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. एकुलता एक मुलगा गमविल्याने आई-वडिलांनी टाहो फोडला. अक्षय हा त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचीही माहिती समोर आलीय. दरम्यान, अक्षयचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे.
भरतीदरम्यान धावताना अनेक तरूणांना आरोग्याची समस्या उद्भवली होती. धुळे येथील प्रेम ठाकरे (29) याची प्रकृती गंभीर आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले असून याशिवाय पवन शिवाजी शिंदे (25), अभिषेक शेटे (24), सुमित किशोर आडतकर (23), साहिल किशोर लवण (19) या चार जवानांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर अमित गायकवाड नावाच्या जवानाला उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची माहिती हाती आली आहे.
हेही वाचा : ‘दादा का वादा पक्का!’ मुख्यमंत्र्यांनी थेट जीआरच दाखवला, आज अधिवेशनात नेमकं काय घडलं?