नाशिक (06 जून) : समाजातील आरोग्य समस्या जाणून घेणे, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व रोगनिदान करण्यासाठी आरोग्य शिबीरांचे भूमीका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिंडोरी तालुक्यातील वणी गावाजवळ पांडाणे येथे मोफत सर्व रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत प्रति-कुलगुरु डॉ. मिंलींद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, लेफ्टनन्ट जनरल राजीव कानिटकर, एम.पी.जी.आय.चे अधिष्ठाता डॉ. सुशिलकुमार, नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, पांडाणेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण साबळे, डॉ. परदेशी , वित्त व लेखाधिकारी एन.व्ही.कळसकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, आरोग्य आणि शिक्षण यांना एकत्र आणून काम करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील व्यक्तींच्या आरोग्याचे प्रश्न समजून त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. काही आजारात तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्षन विषेशतः महिलांचे आजार व लहान मुलांचे आजार यासाठी विशिष्ट प्रणाली असावी जेणेकरुन त्यांच्या रोगाचे निदान व उपचार देणे सोपे होईल. समाजातील व्यक्तींचे आरोग्य सुदृढ असावे यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व आरोग्य सुविधा मिळावी याकरीता आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. समाज सुदृढ झाला तरच पुढील पिढील निरोगी आणि बलषाली राहील यासाठी आपण आरोग्याची काळजी घ्यावी. रोगाचे निदान करण्यासाठी तज्ज्ञांकडून तपासणी व वेळेत औषधोपचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलींद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रमाचा भाग आहे. राज्यातील विविध भागात लोकांच्या आरोग्य समस्या जाणून उपचार होणे गरजेचे आहे, यासाठी कुलगुरुंच्या संकल्पनेतून शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील लोकांचा सहभाग व सहकार्य महत्वपूर्ण आहे. आरोग्याच्या समस्या सुधारण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
रूग्णांचे रोगनिदान – विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठातर्फे आयोजित मोफत सर्व रोगनिदान शिबिरात सुमारे 434 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून रक्तदान शिबीरात मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला असून 39 बॅग रक्त संकलित करण्यात आले आहे. या सर्व रोगनिदान शिबीरात 205 पेक्षा अधिक रुग्णांचे रोगनिदान करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या आजारांची तपासणी – महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संषोधन संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुशिलकुमार झा यांनी सांगितले की, या रोगनिदान शिबीरात हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, सिकलसेल अॅनिमिया आदी रक्ताच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तसेच अस्थिरोग, नेत्ररोग, मोतीबिंदू, काचबिंदू, सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, बालरोग, महिलांचे आजार, श्वेतप्रदर, अंगावरुन लाल जाणे, गर्भाशयाच्या गाठी, पक्षघात, उच्चरक्तदाब, मधुमेह, थाॅयराॅईड, हर्नीया, मूळव्याध, हायड्रोसिल, प्रोस्टेट, पोटाचे व छातीचे आजार आदी आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबीराच्या माध्यमातून समाजात जनजागृती होण्यासाठी पथनाटयाव्दारे विद्यार्थी व स्वयंसेवक यांनी सर्पदंश, हृदय श्वसन चालू करण्याची क्रिया (सीपीआर), अपघात झाल्यास प्राथमिक काळजी या विशयांवर पथनाटयाव्दारे सादरीकरण केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आरोग्य शिबीराचा शुभारंभ झाला. या आरोग्य शिबीरात आशा वर्कर, आरोग्यसेवक यांचा सहभाग होता. विद्यापीठातील अधिकारी व पांडाणे येथील ग्रामस्थ या शिबीराकरीता उपस्थित होते.