चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 15 जून : आमदार किशोर पाटील यांनी जर सबळ पुरव्यानिशी दाखवले की, अमोल शिंदे मातोश्रीवर गेले तर मी राजकीय संन्यास घ्यायला घ्यायला बसलो आहे, असे स्पष्ठीकरण पाचोरा भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिले. आमदार किशोर पाटील यांनी काल आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अमोल शिंदे ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते, असा गौप्यस्फोट केला होता. यावर शिंदे यांनी आज संध्याकाळी पाचोऱ्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करत आमदार पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
अमोल शिंदे यांचे आमदार किशोर पाटील यांना आव्हान –
आमदार किशोर पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल शिंदे म्हणाले की, मी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो, असा आरोप त्यांनी माझ्याबाबत केला. मात्र, आमदारांनी यासंबंधीचे माझे फोन कॉल्सचे रेकॉर्ड तसेच त्या दिवशीचे माझे लोकेशन, मातोश्री वरील CCTV फुटेच, अशा पद्धतीचे कुठलेही येणाऱ्या आठ दिवसांत आणून द्यावेत आणि त्यातून मी मातोश्रीवर गेलो होते, हे सिद्ध झाले तर मी राजकीय संन्यास घ्यायला बसलो आहे. आमदार किशोर पाटील यांनी मी जर मातोश्रीवर गेलो असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले नाही तर त्यांनी पण राजकीय संन्यास घ्यावा, असे आव्हान शिंदे यांनी यावेळी दिले.
आमदार किशोर पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर –
अमोल शिंदे यांनी भाजप खासदार स्मिता वाघ यांच्याविरोधात प्रचार केला, अशी टीका आमदार पाटील यांनी काल केली होती. यावर बोलताना शिंदे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत स्वत: आमदारांनी युती धर्म पाळला नाही. त्यांनी व त्यांच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केले असून स्वत:च्या अंतुर्ली गावात युतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना मोठ्या फरकाने मागे ठेवले व विरोधी उमेदवाराला मताधिक्य मिळवुन दिले. तुमच्या पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी देखील उघड –उघड विरोधी उमेदवार करण पवार यांचे काम केले असून याबाबतीत पुरावे देखील आहेत. पाचोरा- भडगांव तालुक्यातील स्मिताताईंना मिळालेले मताधिक्य हे फक्त आणि फक्त भाजपाच्या तळागाळातील कार्यकत्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ असल्याचे यावेळी शिंदे म्हणाले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती व तालुका सरचिटणीस बन्सीलाल पाटील, परेश पाटील, शहराध्यक्ष दीपक माने, रमेश वाणी, अरुण पवार, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांच्यासह भाजपचे तालुका पदाधिकारी उपस्थित होते.