मुंबई, 2 फेब्रुवारी : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले असून मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांचा दावा –
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका वृतवाहिनीसोबत बोलताना छगन भुजबळ यांच्याबाबत मोठा दावा केला. त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 400 च्या वर खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी त्यांना जिथून कुठून मते मिळतील ती हवीच आहेत. मग ती दोन-तीन टक्के का असेनात. त्यासाठी भाजप कुठल्याही स्तराला जाऊ शकतो, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर –
छगन भुजबळ यांच्यासारखे राजकारणातून संपलेल्या नेत्यांना पुन्हा उभे केले जाते आहे. भाजपच्या सरकारने छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणात तुरुंगात पाठवले होते. आता त्याच भुजबळ यांना आपल्या फायद्यासाठी थेट भाजपमध्ये घेतले जात आहे. त्यांना ओबीसींचा राष्ट्रव्यापी चेहरा बनवण्याची भाजपची योजना असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.
भुजबळांनी दावा फेटाळला –
अंजली दमानिया यांनी हा दावा केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. मंत्री भुजबळ म्हणाले की, मला भाजपच्या ऑफरबद्दल काही माहिती नाही. दमानियांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहीत नाही. मीडियाने हे त्यांनाच विचारावे. मला कुठल्या पदाची हाव नसून मी मंत्री आहे. माझ्या पक्षात माझे सुरळीत चालले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी समाजासाठी काम करत आहे. त्यामुळे आता नवीन काही नको. मला असे कुठलेही प्रपोजल आलेले नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात दाखल, अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे केले भूमिपूजन