जळगाव, 24 जुलै : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचप्रकरणाची बातमी ताजी असतानाच आज पुन्हा एकदा जळगावातून लाचप्रकरण समोर आले आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी सुनिल भागवत (वय 38) हिच्यावर जळगाव लाचलुपचपत विभागाने 5 हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
पगार बीलामध्ये काहीही त्रुटी न काढता पगार बीलावर सह्या करून ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या मोबदल्यात 10 हजार रूपायांची लाच मागितल्यानंतर 5 हजार रूपये लाच म्हणून स्वीकारताना जळगाव एसीबीने माधुरी भागवतला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भौतिक उपचार तज्ञ तथा प्रभारी अधिक्षक वर्ग 2 या पदावर शासकिय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगांव या कार्यालयात कार्यरत आहेत. ते पगार बिलाच्या कामासंदर्भात दि. 14 जुलै 2025 रोजी जिल्हा दिव्यांग विभाग, जिल्हा परीषद कार्यालय, जळगांव येथे गेले असता जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी भागवत यांची त्यांनी भेट घेतली.
महिला अधिकाऱ्याने केली लाचेची मागणी –
यावेळी तक्रारदार यांचे जुन 2025 च्या पगार बिलामध्ये काहीही त्रुटी न काढता पगार बिलावर सह्या करून ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे 12 हजार रूपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 22 जुलै रोजी लाचप्रतिबंधक विभाग जळगाव यांचेकडे लेखी तक्रार दिली होती.
…अन् एसीबीने पकडले रंगेहाथ –
यानंतर 22 जुलै रोजी लाचपडताळणी केली असता माधुरी भागवत यांनी 10 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअती प्रथम हफ्ता म्हणून 5 हजार रूपये तर उर्वरित 5 हजार रुपये रक्कम इतर बिले निघाल्यावर द्या, अशी पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, जळगाव लाचलुपचपत विभागाने आज 24 जुलै रोजी सापळा रचत माधुरी भागवत यांना तक्रारदार यांचेकडून 5 हजार रूपयांची लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
यांनी केली कारवाई –
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सुरेश पाटील, शैला धनगर, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा : 2000 हजार रूपयांची लाच मागितली अन् एसीबीने पकडले रंगेहाथ; जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं काय घडलं?