अमळनेर, 6 एप्रिल : महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अनुक्रमे 11 एप्रिल आणि 14 एप्रिल रोजी जयंती साजरी केली जाणार आहे. दरम्यान, या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांनी फुलहार, मेणबत्ती, पुष्पगुच्छ आणण्याऐवजी एक वही एक पेन आणण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
समाजाला परत मोबदला देण्यासाठी डॉ. आंबेडकर अध्ययन केंद्राच्या माध्यमातून सामाजिक परिषदेने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती तर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. यावेळी शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पोलीस प्रशासन आदी क्षेत्रातील नागरिक अभिवादन करण्यासाठी मेणबत्ती, पुष्पगुच्छ, फुले, हार आदी प्रकारचा खर्च करीत असतात. त्यापेक्षा नागरिकांनी अभिवादनासाठी एक वही व एक पेन आणल्यास गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो.
समाजातील सर्व स्तरातील शैक्षणिक प्रगती करण्यासाठी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची गरज असल्याने नागरिकांनी फुले आंबेडकरांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी एक वही एक पेन आणावे, असे आवाहन प्रा. विजयकुमार वाघमारे, प्रा. कृष्णा संदानशिव, राहुल संदानशीव, नितीन संदानशीव यांनी केले आहे.