जळगाव, २५ सप्टेंबर : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी नवीन तसेच नुतनीकरणाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. समाजकल्याण विभागामार्फत ही योजना ऑनलाईन पद्धतीने https://hmass.mabait.org या पोर्टलवर राबविण्यात येत आहे.
पूर्वी ही योजना जिल्हास्तरावर लागू होती. मात्र शासन निर्णय दि. २६ डिसेंबर २०२४ अन्वये आता ती तालुकास्तरावर देखील लागू करण्यात आली आहे. शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेले, परंतु प्रवेश न मिळाल्याने निवास व भोजनाच्या सुविधांअभावी शिक्षण घेण्यात अडचण निर्माण झालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत वार्षिक निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकांतील असावा. शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. प्रवेशित महाविद्यालय/शैक्षणिक संस्थेच्या महानगरपालिका हद्दीत स्थानिक रहिवासी नसावा. इयत्ता १० वी, ११ वी व १२ वी करीता प्रतिवर्षी किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के). पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
स्वाधार योजनेमार्फत लाभार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता, तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भत्ता देण्यात येणार आहे. तेव्हा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता योजनेचे नविन आणि नुतनीकरणाचे अर्ज https://hmass.mabait.org या ऑनलाईन पोर्टलवर स्विकारले जात असुन स्वाधार योजनेतंर्गत लाभासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह नविन व नुतनीकरणाचे परिपूर्ण अज भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह सहायक आयुक्त समाज कल्याण जळगांव, मायादेवी मंदिरा समोर, महाबळ रोड जळगांव येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन डॉ. अनिता राठोड, सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगांव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्नवारे केले आहे.