संदीप पाटील, प्रतिनिधी
देवगाव, (पारोळा) – एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील पोलीस पाटील यांच्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. देवगाव येथे शुक्रवारी पोलिस पाटील दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार अमोल पाटील यांनी काय घोषणा केली –
मतदारसंघातील पोलीस पाटलांनी कोरोनाकाळात आपल्या जिवाची पर्वा न करता आरोग्यासाठी चांगली कामे केली. त्यामुळे त्यांच्या कामाची उतराई म्हणून एरंडोल विधानसभा मतदारसंघातील 150 पोलीस पाटलांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात येईल, अशी घोषणा आमदार अमोल पाटील यांनी केली. तसेच पोलीस पाटलांच्या समस्या विधानसभेत मांडून नक्कीच न्याय मिळवून देईन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी पोलीस पाटील यांना दिले.
यांची होती उपस्थिती –
देवगाव येथे शुक्रवारी पोलीस पाटील दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक सुनील पवार तसेच सपोनि गोसावी, सपोनि देवरे उपस्थित होते. तर कार्यक्रमाप्रसंगी माजी सभापती डॉ. सुभाष पाटील, देवगावचे सरपंच समीर पाटील, शेतकी संघाचे संचालक दासभाऊ पाटील, सचिन पाटील यांच्यासह पोलिस पाटील संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व तालुक्यातील पोलिस पाटील उपस्थित होते.