पुणे : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसात पक्षांतराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता सत्तापक्षाकडे अनेकांची वाटचाल होत असताना दिसत आहे. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
पुण्यातले काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच ते लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. याबाबत रविंद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
काय म्हणाले रविंद्र धंगेकर –
रविंद्र धंगेकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, कुठलाही निर्णय घेणे कठीण असतो कारण ज्या पक्षाबरोबर गेली 10-12 वर्षे काम करत आहे, त्या पक्षातील कौटुंबिक नाती निर्माण होत असतात. सर्वांनीच आपल्याला प्रेम केलंय. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाने ताकद उभी केली. सर्वांनी भाग घेतला. सर्वांनी कष्ट केले. पक्ष सोडताना मनात दु:ख होतंय. शेवटी आपण माणूस आहे.
कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून ऐकत नव्हते. मतदारांचं म्हणणं होतं की आमची कामं कोण करणार. लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय आपण सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही. त्यांची कामं करू शकत नाहीत. अशावेळी मी मध्यंतरी 1-2 वेळा एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो. आमचे मित्र उदय सामंत यांच्याशीही बोललो. पण ते बोलले की, आमच्याबरोबर काम करा.
कार्यकर्त्यांशी बोलल्यावर लक्षात आलं की, सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मला काँग्रेसचा आमदार असूनही शिक्षण मंडळाची भरतीत सहकार्य केलं. मग असं लक्षात आलं की, ज्यांचा चेहरा सर्वसामान्यांमध्ये पोहोचलेला आहे त्यांच्याबरोबर काम करायला काय हरकत आहे, अशी मानसिकता झाली आणि आज मी सर्वानुमते निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांबरोबर काम करावं. आज सायंकाळी त्यांची माझी भेट होईल. त्यानंतर त्यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याची माहिती रविंद्र धंगेकर यांनी दिली.
हेही वाचा – आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का?, अजितदादा काय घोषणा करणार?